नवे पान
नमस्कार.
विज्ञान केंद्राच्या उपक्रमांमधले एक नवे पान आता सुरू होत आहे.
१ डिसेंबर २०२४ पासून १७ ऑगस्ट २५ पर्यंत विविध विषय घेऊन माहिती देणारी व्याख्याने विज्ञान केंद्रात आयोजित केली गेली. त्यावेळी त्या क्षेत्रातल्या जाणकार व्यक्तींनी पूर्ण सहकार्य करून छोट्याशा जनसमुदायासमोर आपले विचार मांडले. विज्ञान केंद्राच्या या उपक्रमाला श्रोत्यांनीही चांगला प्रतिसाद दिला.
साधारणपणे दर रविवारी, व्याख्यान, चर्चा, कोडी सोडवणे, विज्ञान दैनंदिनी या निमित्ताने विज्ञान तंत्रज्ञानात रस असणारे विविध वयांचे लोक संध्याकाळी एकत्र येत होते.
तरी देखील हा उपक्रम आता थांबवण्यात येणार आहे. त्या ऐवजी महिन्यातल्या (आधी ठरवलेल्या) एका रविवारी प्रकल्प सादरीकरण या उपक्रमात श्रोते आणि सादरकर्ते एकत्र येतील. त्या विषयीचा तपशील पुढे देत आहे.
प्रकल्प
विज्ञान म्हणजे नव्या-जुन्या संकल्पना मांडणे आणि त्यांचा पडताळा प्रयोगाने पहाणे. असे प्रयोग कृतियुक्त असतात. अशा प्रकल्पांची व्याख्या करणे चुकीचे असले तरी त्यांचे थोडेसे वर्णन करणे शक्य आहे.
वस्तुरूप प्रकल्प
प्रकल्प कृतिशीलतेतून जन्म घेतात त्यामुळे एखादी लहान मोठी वस्तू तयार होते. या वस्तूंकडून पुढील अपेक्षा करता येतात.
- ही वस्तू फार खर्च करून बनवलेली नसली तरी चालते.
- ही वस्तू फार प्रेक्षणीय नसते. तिला बाजारू सौंदर्य नसते.
- ही वस्तू, प्रकल्प करणाऱ्या एक किंवा अनेक व्यक्तींच्या शारीरिक व बौद्धिक श्रमांतून तयार होते.
- सादरीकरणाच्या वेळी या वस्तूचा वापर यशस्वीपणे दाखवता येतो.
- वस्तूच्या कार्यामागील तत्व प्रकल्पकाराला नीटपणे विषद करता येते.
- वस्तू बनवताना येणाऱ्या अनुभवांच्या नोंदी विज्ञान दैनंदिनीत पद्धतशीरपणे केलेल्या असतात.
अभ्यास प्रकल्प
काही प्रकल्प अभ्यास करण्याचे असतात. उदा. वनस्पतींची माहिती एकत्रित करणे किंवा रोजच्या तापमानाची नोंद करणे, आकाश-निरीक्षण करणे, कोडे सोडवणे इत्यादी. या प्रकल्पांकडून पुढील अपेक्षा करता येतात.
- नोंदी खऱ्या असाव्यात. प्रकल्पकाराने स्वतः प्रयोगानंतर केलेल्या असाव्यात.
- या नोंदी करताना विज्ञान दैनंदिनी ठेवण्याची मार्गदर्शक तत्वे पाळली जावीत.
- नोंदी केल्यावर त्यातून निष्कर्ष काढता यावा. किंवा त्या नोंदींची संख्या सादरीकरण करण्याइतपत असावी.
असा कोणताही एक प्रकल्प घेऊन त्यावर काम करून ज्यांना तो सादर करण्याची इच्छा असेल त्यांनी विज्ञान केंद्राशी संपर्क साधावा. आधी ठरवून पुढील महिन्यातील सादरीकरणाच्या कार्यक्रमासाठी अशा प्रकल्पांचा विचार करता येईल.
आपण आता माहितीकडून कृतीकडे जात आहोत. एक नवे पान आता सुरू होत आहे.
--विज्ञानदूत