रविवारची सभा
विज्ञान केंद्रात दर रविवारी संध्याकाळी ४-३० ते ५-३० या वेळात विज्ञान केंद्राच्या सभागृहात एक उपक्रम केला जातो. या वेळात व्याख्यान, मुलाखत, सादरीकरण, प्रात्यक्षिक सादर केले जाते. सादरकर्ते त्या विषयाचे तज्ञ किंवा अभ्यासक असतात. अशा होऊन गेलेल्या कार्यक्रमांविषयी माहिती देणारे हे पान.
दिनांक २३ मार्च २०१५ पर्यंत परीक्षांचे दिवस असल्यामुळे रविवारच्या सभा होणार नाहीत. त्या कधी सुरू होतील हे नेहमीच्या सदस्यांना कळवले जाईल.
इमेल विषयी बरेच काही
रविवारच्या सभेत दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी विज्ञानदूत यांचे "इमेल विषयी बरेच काही" या विषयावर व्याख्यान झाले. या व्याख्यानात त्यांनी नेहमी वापरल्या जाणाऱ्या मोफत इमेल सेवा वापरण्याचे धोके दाखवले. कोणत्या मोफत सेवा निर्धोक आहेत त्या विषयी देखील माहिती दिली.
सेंद्रिय घरबाग
रविवारच्या सभेत दि. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी शेती तज्ञ डॉ.अविनाश दांडेकर यांचे "सेंद्रिय घरबाग" या विषयावर व्याख्यान व प्रात्यक्षिक झाले. या वेळी त्यांनी घन जीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. शेवटी श्रोत्यांनी विचारलेल्या घरातील बागेबद्दलच्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली.
मुक्त संगणक प्रणाली (free software)
रविवारच्या सभेत दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी विज्ञानदूत यांचे "मुक्त संगणकीय प्रणाली" या विषयावर व्याख्यान झाले. या व्याख्यानात त्यांनी पुढील मुद्द्यांचा विचार केलाः
- Free Software म्हणजे काय ?
- कोणत्याही व कितीही संगणकांवर स्थापित करण्याचे स्वातंत्र्य
- प्रणालीच्या मूळ स्रोतांचा अभ्यास करण्याची संधी व स्वातंत्र्य
- प्रणालीच्या स्रोतात बदल करण्याचे स्वातंत्र्य
- प्रणालीच्या बदल केलेल्या स्रोताचे वितरण करण्याचे स्वातंत्र्य
- मुक्त संगणकीय प्रणाली (Free Software) कुठे वापरण्यात येतात ?
- Free Software का वापरायचे ?
- कोणते सॉफ्टवेअर मुक्त नाही ? त्या ऐवजी काय वापरता येईल ?
- श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे
प्लास्टर ऑफ पॅरिसचे (POP) पुनर्चक्रीकरण (recycling)
रविवार दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी डॉ. भाग्यश्री गाडगीळ व डॉ. जयंत गाडगीळ यांची मुलाखत चित्ररेखा मेहेंदळे यांनी घेतली. प्लास्टर ऑफ पॅरिसचे (POP) पुनर्चक्रीकरण (recycling) या विषयावर ही मुलाखत झाली. या मुलाखतीत तज्ञांनी पुढील विषयांचा परामर्ष घेतला.
- pop म्हणजे काय, यात पॅरिसचा काय संबंध ?
- pop व्यवहारात कुठे कुठे वापरले जाते ?
- pop चे रीसायकलिंग का करायचे ?
- रीसायकलिंगची पद्धत खर्चिक आहे का (आर्थिक आणि ऊर्जा खर्चाच्या दृष्टीने) ?
- pop ला नवजीवन मिळाले आहे हे कसे तपासायचे, त्याचा दर्जा कसा ठरवायचा ?
- पुनरुज्जीवित pop चे काही तोटे आहेत का ?
- रीसायकलिंगमुळे कोणत्या व्यावसायिकांचा फायदा होईल, कोणत्या व्यावसायिकांचा तोटा होईल ?
- ताजे pop कसे बनवतात, काय दराने विकतात, पुनरुज्जीवित pop काय दराने विकता येईल ?
- pop न वापरता उत्सवमूर्ती बनवता येतील का, असल्यास कोणते पर्याय उपलब्ध आहेत ?
- घरबांधणी क्षेत्रात पुनरुज्जीवित pop वापरल्याने कामाचा दर्जा खालावेल का ?
- सामान्य नागरिकाला या संदर्भात काय करता येईल ?
पर्यावरण व वीज या विषयांवर श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे
पर्यावरण व वीज या विषयावर पूर्वी व्याख्याने झाली होती. त्या विषयांबद्दल श्रोत्यांच्या मनात उद्भवलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा कार्यक्रम रविवार दि. १९ जानेवारी २५ रोजी झाला. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रा. उदय ओक, विज्ञानदूत व डॉ. पुरुषोत्तम डांगे यांनी उत्तरे दिली. प्रा. ओक यांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन वैज्ञानिक मनोभूमिका म्हणजे काय हे स्पष्ट केले.
बदलेले डोंगर आणि आपली जीवनशैली
या विषयावरील व्याख्यान रविवार दि. १२ जानेवारी २५ रोजी दिले गेले. व्याख्याते होते डॉ पुरुषोत्तम डांगे. त्यांनी पुढील गोष्टींची चर्चा या व्याख्यानात केली.
- पर्वतीय परिसंस्था (mountain ecosystems)
- मानवी विकासात पर्वतीय परिसंस्थेची भूमिका(Role of mountain ecosystem in human development).
- नागरीकरणामुळे डोंगरांचा ऱ्हास (Degradation of mountains due to urbanization).
- मानवनिर्मित कचऱ्याचे पर्वत आणि त्यावर आधारित जीवननिर्वाह (Man-made garbage mountains and livelihood dependent on them).
- कचऱ्याच्या पर्वतांच्या समस्येवर मात करण्यासाठी नागरिकांनी टाकण्याची पावले. (Simple steps to be taken by citizens to help overcome the problem of garbage mountains).
- श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे.
वीज, घरातली व कारखान्यातली
या विषयावरील व्याख्यान रविवार दि. ५ जानेवारी २५ रोजी दिले गेले. व्याख्याते होते श्री. अभिजीत सूर्यवंशी. त्यांनी पुढील गोष्टींची चर्चा या व्याख्यानात केली.
- थ्री फेज व सिंगल फेज विद्युत म्हणजे काय ? घरात सिंगल फेज व कारखान्यात थ्री फेज विद्युत वापरतात.
- अर्थ आणि न्यूट्रल यांचे महत्व व त्या मधील फरक.
- विजेचा धक्का का बसतो, कसा बसतो, कसा टाळावा याचे विवेचन.
- घरगुती विजेचे बिल ज्या मीटरवर येते त्याची माहिती. इलेक्ट्रॉनिक मीटरचे निरीक्षण करून आपले वीज बिल योग्य येते आहे ना हे ठरवता येते. त्यासाठी उघडझाप करणारा एल्.इ.डी. व त्या जवळील माहिती समजणे महत्वाचे.
- घरातील विजेचे बिल कसे आटोक्यात ठेवता येईल त्याची माहिती. पाणी गरम करण्यासाठी किंवा अन्न व हवा गार करण्यासाठी वापरली जाणारी उपकरणे खूप वीज वापरतात. त्यांचा वापर किमान करावा.
- श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे.
विज्ञान केंद्राच्या बाल सदस्यांनी केलेले सादरीकरण
रविवार दि. २९ डिसेंबर २०२४
- आदित्य डांगे याने "प्रदूषण" या विषयावर स्वतः हाताने बनवलेली पोस्टर्स वापरून माहिती सादर केली.
- जाह्नवी डांगे हिने "पाणी" या विषयावर स्वतः हाताने बनवलेली पोस्टर्स वापरून माहिती सादर केली.
- विज्ञान केंद्राचे चालक विज्ञानदूत यांनी न्यूटन च्या जयंती निमित्त, लंबकाचा (simple pendulum) प्रयोग केला. त्यात लोकांचा सहभाग होता. यात हे सूत्र वापरून प्रयोगस्थळावरील गुरुत्वीय त्वरणाचा किंमत (value of gravitational acceleration) शोधून काढली.
पर्यावरण साक्षरता
रविवार दि. २२ डिसेंबर २०२४
प्रा. उदय ओक यांचे "पर्यावरण साक्षरता" या विषयावर व्याख्यान झाले.
Dicliptera Polymorpha
रविवार दि. १५ डिसेंबर २०२४
व्यवसायाने इंजिनिअर असलेले श्री. आदित्य धारप यांनी त्यांनी स्वतः नव्याने शोधलेल्या Dicliptera polymorpha या वनस्पतीची माहिती दिली. त्यांची मुलाखत घेतली विज्ञान केंद्र सदस्य श्रीमती चित्ररेखा यांनी.
ही वनस्पती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही वनस्पती pyrophytic आहे. pyrophytic म्हणजे आगीशी सामना करून जिवंत राहणाऱ्या वनस्पती. एवढेच नव्हे तर त्या आगीच्या प्रकोपानंतर फुलोऱ्यावर येऊन, आगीनंतरच्या परिस्थितीचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घेणाऱ्या वनस्पती. आफ्रिकेच्या आणि ऑस्ट्रेलियाच्या मैदानी, गवताळ प्रदेशात अशा प्रकारातल्या वनस्पती आढळतात. भारतातही काही निवडक वनस्पती pyrophytic आहेत.
सापाची ओळख
रविवार दि. ८ डिसेंबर २०२४
सर्पमित्र श्री. योगेश अंबीकर यांचे "सापाला ओळखा" या विषयावर व्याख्यान झाले. त्यांनी पूर्वी पकडून, रानात सोडून दिलेल्या विषारी व बिनविषारी सापांचे फोटो दाखवत त्यांनी हे व्याख्यान दिले. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना, शंकांना त्यांनी उत्तरे दिली.
विद्युत-चुंबकीय क्षेत्र व जेम्स क्लार्क मॅक्सवेल
रविवार दि. १ डिसेंबर २०२४
सर्व विश्वात संचार करणाऱ्या विद्युच्चुंबकीय क्षेत्रे व लहरींचा शोधक जेम्स क्लार्क मॅक्सवेल याच्या चरित्रावर आधारित, विज्ञान केंद्राचे चालक विज्ञानदूत यांनी व्याख्यान दिले.