सर्वांसाठी विज्ञान ७
"विज्ञान सर्वांसाठी" या विषयावर मी काही काळापूर्वी रेडिओ इन्फिनिटी या कम्युनिटी रेडिओवर जी आठ व्याख्याने दिली ती क्रमाने येथे देत आहे. हे माझं सातवं व्याख्यान.
ऐका...
मात्र तुम्हाला हे व्याख्यान वाचायचं असेल तर तुम्ही ते इथेच वाचू शकता. ते भाषण लिखित रूपात पुढे दिलं आहे.
विज्ञानाच्या मर्यादा आणि दोष
माणसाला आजूबाजूचं जग समजून घेता येतं ते त्याच्या ज्ञानेंद्रियांच्या बळावर. त्यापैकी डोळा सर्वात महत्वाचा कारण लक्षावधी अंतरावरचे ग्रहतारे तो पाहू शकतो. प्रकाशाची संवेदना माणसाला डोळ्यांमुळे होते. प्रकाश ही माणसानं मिळवण्याच्या ज्ञानाची मर्यादा आहे असं म्हणता येतं. कोणी म्हणेल की जिथे ही ज्ञानेंद्रिय थकतात, तिथे माणसानं यंत्रं निर्माण केली. उदा. विजेचा दाब मोजण्यासाठी स्पर्शाचा वापर घातक आहे हे लक्षात येऊन त्यानं वेगळ्या प्रकारचे मीटर्स निर्माण केले. हे खरं आहे. पण या मीटर्सनी दाखवलेला विद्युतदाबाचा आकडा डोळ्यांनीच पहावा लागतो ना !
विश्वात अशा प्रकारची ऊर्जा असेल की जिचं रूपांतर, माणसाला जाणवेल अशा ऊर्जेत करता येत नाही, तर ती ऊर्जा माणसाला समजणार नाही. विश्वाच्या त्या क्षेत्राचं ज्ञान माणसाला होणार नाही.त्रिमित जगापलीकडे समज नाही
विज्ञानाला आणखी एक मर्यादा आहे ती त्रिमित जगाची. गणित असं सांगतं की अशा अनंत मिती असू शकतात. पण आपण आजवर तरी अशा इतर मितींचा अनुभव घेतलेला नाही. काळ ही संकल्पना चौथ्या मितीसारखी वापरली जाते. पण त्यापलीकडे माणूस अजून गेलेला नाही. इतकंच नव्हे तर या मितीमधे आपण एकाच दिशेनं म्हणजे फक्त भविष्यकाळात जाऊ शकतो. ही देखील एक मर्यादाच.
विज्ञान म्हणजे माणसानं समजून घेतलेलं विश्व
आजचं विज्ञान हे मानव केंद्रित आहे. माणसाला होणारं विश्वरूपदर्शन आहे.
- विज्ञान शब्दांतून व्यक्त करावं लागतं ही एक मर्यादा. गणित हा त्यावरचा एक उपाय आहे. पण तो पुरेसा आहे का ?
- माणूस हा निसर्गाचा एक भाग आहे. निसर्गाच्या एका भागाला जाणवलेली सत्यं परमसत्य असतील का हे सांगता येणार नाही. एक उदाहरण
पाहूया.
माणसाला जग जसं रंगीत दिसतं तितकं कुत्र्याला दिसत नाही. कारण कुत्र्याच्या डोळ्यात दंडगोलाकार पेशींची संख्या माणसापेक्षा कमी असते. काही कीटकांना, सापाला रात्री दिसतं कारण त्यांच्या डोळ्यात अतिरक्त म्हणजे इन्फ्रारेड किरणांची संवेदना होणाऱ्या पेशी असतात.
माणसाला झालेलं निसर्गाचं ज्ञान एक मर्यादित चौकटीतच रहातं आणि अशा कारणांमुळे मर्यादितच रहातं. - निसर्गाचे नियम असे मर्यादित संदर्भ चौकटीत समजून घेतल्यावर त्यांचा स्वतःच्या सोयीसाठी वापर म्हणजे तंत्रज्ञानाची निर्मिती. माणसानं ते केलं आहे. पण या चौकटींचा संदर्भ त्या तंत्रज्ञानालाही आहे. डासांचं संपूर्ण निर्मूलन करण्यात माणसाला आलेलं अपयश या कारणामुळे असेल का ?
- माणसानं माणसाच्याच सोयीचा विचार केला यात अनैसर्गिक असं काही नाही. पण झुरळांनी जर विज्ञानात प्रगती केली असती तर त्यांनी माणसाकडे किती आणि कसं लक्ष दिलं असतं याचा विचार करून पहा.
विज्ञान तंत्रज्ञान मानवी-किंवा इतरांच्याही भावनांचा विचार करू शकत नाही.
माणसाच्या मनाचं गणिती प्रतिमान करणं अतिशय किचकट आहे. आज तरी ते शक्य वाटत नाही. आणि ते शक्य होऊ सुद्धा नये. तसं झालं तर इतरांच्या मनावर नियंत्रण गाजवण्याची इच्छा त्याला होईल. ही हाव सर्वंकष सत्तेची असेल. Foundation Triology या कादंबरी मालेत आयझॅक एसिमॉव्ह यांनी हा विचार मांडला आहे. एक प्रकारे त्यांनी आपल्याला दिलेला हा इशाराच म्हणावा लागेल.
माणसानं विज्ञानाचा वापर स्वजातीसाठी म्हणजे माणसांसाठी केला. निसर्गातल्या इतर प्राणी वनस्पतींना त्यानं तुच्छ लेखून नियंत्रित केलं. स्वतःचा उद्धार करायचा म्हणजे इतर प्रजातींवर अन्याय करणं आलंच. वृक्षतोड, कीटकनाश, शिकारी, यांमुळे निसर्गातील इतर प्रजातींवर अन्याय माणसानं केला.
आता हाच नियम थोडा पुढे वाढवा. विज्ञान-तंत्रज्ञान वश करणारा एक मानवी वंश दुसऱ्या मानवी वंशाचा विनाश करू इच्छितो. अगदी कीटक, झाडं यांचा केला तसाच. माणसातलीच एक उपजात दुसऱ्या उपजातीला तंत्रज्ञान वापरून नेस्तनाबूत करू इच्छिते. युद्धात उच्च तंत्रज्ञान वापरून दुसऱ्या वंशांना नष्ट करण्यासाठी केलं गेलेलं क्रौर्य आठवा.
अगदी व्यक्तिगत पातळीवरही माणूस जितकं उच्च तंत्रज्ञान वापरत गेला तितका तो इतरांपासून दूर गेला हे लक्षात येतं. हे समजून घ्यायसाठीचं उदाहरण अगदी साधं आहे. व्यक्तिगत मोबाइल आल्यापासून लोकांनी समोरासमोर बसून गप्पा मारण्याचं सोडून दिलं आहे. माणसं एकलकोंडी होत चालली आहेत. संगणक विश्वातले खेळ खेळताना वास्तव काय आहे याचं भान न राहिल्यामुळे २४ तास फक्त संगणकावर आयुष्य घालवणारे आज निर्माण झाले आहेत.
सर्वात मोठा दोष
विज्ञान तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा दोष आहे नीतिमत्तेकडे डोळेझाक.- धर्मांनी ही नीतिमत्ता सांगणं अपेक्षित आहे, पण ते परिणामशून्य झालेले दिसतात. कारण लोकांकडे खऱ्या धर्मतत्वांबद्दलचा विचार करण्यासाठी तंत्रज्ञानानं वेळच मोकळा ठेवलेला नाही. अडीच हजार वर्षांपूर्वी उघड उघड युद्धविरोधी भूमिका घेणाऱ्या भगवान बुद्धांना आजच्या तंत्रज्ञानाचा युद्धात वापर केलेला पाहून काय वाटलं असतं ?
- अशा या विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे साइड इफेक्ट्स खूप आहेत. आपण कोणत्या तरी संकटावर मात करायला काहीतरी उपाय शोधला. पण तो
वापरल्यावर मात्र रोगापेक्षा उपाय भयंकर अशी परिस्थिती निर्माण झाली. काही उदाहरणं पाहूया.
- ddt चं उदाहरण जगप्रसिद्धच आहे. १९४५ सालापासून अत्यंत परिणामकारक ठरलेलं ddt हे कीटकनाशक माणसाच्या आणि एकूणच निसर्गाच्या कार्यपद्धतीत किती ढवळाढवळ करतं हे सिद्ध झालं. रॅशेल कार्सन या जीवशास्त्रज्ञ लेखिकेनं सायलेंट स्प्रिंग या पुस्तकात डीडीटी वर प्रचंड हल्ला चढवला. कीटकनाशकं मानवासाठी किती हानीकारक आहेत याबद्दल लिहिल्यामुळे रोगापेक्षा उपाय भयंकर ही उक्ती लोकांना अनुभवता आली.
- तथाकथित उच्च तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेला कचरा ही साऱ्या जगात फार मोठी समस्या झाली आहे. वापरा आणि फेकून द्या या ग्राहकांच्या
वृत्तीमुळे कचऱ्याचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. कितीही मोठ्या प्रमाणात कमीत कमी उत्पादन खर्चात अधिकाधिक उत्पादन करण्याचं तंत्र
कारखान्यांनी आत्मसात केलं आहे.
या कारखानदारांना स्वतःला मिळणाऱ्या नफ्यात वाढ या शिवाय दुसरं काही दिसतच नाही.
तंत्रज्ञानाचा वापर करून कारखानदारही ग्राहकांना त्यांच्या घातक वस्तूंचं व्यसन लावतात, त्यांच्या वागण्याच्या पद्धतीही तेच ठरवतात. दुरुस्त न होणारी यंत्रं-उत्पादनं ते बनवतात. ग्राहक ती विकत घेतात आणि वापरून फेकून देतात. डिसेंबर २०२० मध्ये पृथ्वीवरील मानवनिर्मित वस्तूंचं वजन हे पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या वजनाइतके झालेलं होतं असं आकडेवारी सांगते. या वस्तू दुरुस्त होण्यासारख्या नाहीत. निरुपयोगी झाल्यावर निसर्गात शोषूनही घेतल्या जाणार नाहीत. - ऊर्जेवर अवलंबून "प्रगती". माणसाची तथाकथित प्रगती ऊर्जेचा प्रचंड नाश करते आहे. कोणतीही ऊर्जा वापरली गेली की त्यापैकी काही ऊर्जा अनुपयुक्त ऊर्जेत रूपांतरित होत असते. त्यात अनुपयुक्त उष्णता, अनुपयुक्त आवाज, अनुपयुक्त व आरोग्याला मारक धूर आणि रसायनं निर्माण होतात. ही केवळ माणसालाच घातक असतात असं नाही तर एकूणच निसर्ग-चक्रांना हानीकारक ठरतात. त्याचा परिणाम म्हणून हवा, पाणी, अन्न यांचं प्रदूषण होताना आपल्याला दिसतं. तापमानात झालेली अनैसर्गिक वाढ नद्यांना प्रचंड पूर आणू शकते. या साऱ्यांचा अभ्यास विज्ञान करू शकतं. पण निर्णय घेणाऱ्यांचं आणि ग्राहकांचं वर्तन बदलण्यात विज्ञान अपयशी ठरताना दिसतं. असं वर्तन बदलणं हे विज्ञानाचं कामच नव्हे असा प्रतिवाद काही लोक करतात. पण विज्ञान तंत्रज्ञान निसर्गाच्या हितरक्षणाबाबत आंधळं आहे हाच दोष तर मी सांगतो आहे ना. हवामान बदल हा विज्ञान तंत्रज्ञानामुळे झालेल्या तथाकथित प्रगतीचा एक प्रमुख परिणाम आहे. निसर्गाचा कणाच मोडायचा अशी प्रतिज्ञा माणसानं केली आहे की काय न कळे.
- शतकानुशतकं निसर्गानं जमिनीखाली तयार केलेलं इंधन औद्योगिक प्रगतीच्या नावाखाली माणसानं गेल्या तीन शतकांत जवळ जवळ वापरून टाकलं आहे. आर्थिक भाषेत याला भांडवलच खाऊन पोट भरणं असं म्हटलं जातं. नवे ऊर्जा स्रोत सांगितले जातात तितके परिणामकारक नाहीत.
आजच्या विज्ञानाबद्दल
सत्ता आणि धन यांच्याच घरी विज्ञान-तंत्रज्ञान आज पाणी भरतं आहे.मूलगामी संशोधनासाठी पैसा खूप लागतो आहे. एकट्या व्यक्ती किंवा छोटे समूह मूलगामी संशोधन करूच शकत नाहीत. जर असं संशोधन केलं गेलं तर ते परिणामकारक नाही, उलट घातकच आहे अशी आवई उठवली जाते. एखादं संशोधन खऱ्या अर्थानं चांगलं, genuine आहे का हे सामान्य माणसाला आज समजूच शकत नाही.
राजकीय आणि आर्थिक सत्ताधीशांना गैरसोयीचं संशोधन मारलं जाऊ शकतं. त्यांना हवं असलेलं खोटं संशोधन लोकांच्या माथी मारता येतं, मारलं जातं.
समारोप
या भाषणात विज्ञान तंत्रज्ञानाच्या मर्यादा, दोष दाखवताना मी एक निगेटिव्ह, भीषण चित्र रंगवलं आहे असं वाटेल. पण मी फक्त सत्य सांगितलं आहे. इतकंच नव्हे तर या साऱ्यावरचा उपायही मी सुचवणार आहे. तो आहे सम्यक तंत्रज्ञान. त्याबद्दल ऐका पुढच्या व्याख्यानात.
संपर्क
आमच्याशी संपर्क साधाःContact us here:

लेखकः विज्ञानदूत, तारीखः २३ नोव्हेंबर २०२२