vidnyanlekhan_logo

विज्ञान केंद्र

इलेक्ट्रॉनिक्सचा छंद - केल्याने होत आहे रे...

इलेक्ट्रॉनिक्सच्या माझ्या अभ्यासाला छंद म्हणूनच सुरुवात झाली. या छंदातून पुढे आपल्याला इंजिनियर होता येईल अशी काही अपेक्षा नव्हती. रेडिओ दुरुस्ती करता करता इलेक्ट्रॉनिक्सच्या सुट्या भागांची आणि त्यांच्या कार्याची ओळख झाली. जादू वाटणाऱ्या गोष्टी तयार करणं, किंवा निदान दुरुस्त तरी करता येणं हा एक वेगळाच आनंद होता. या आनंदामुळेच हा छंद पुढे जोपासला गेला. जिथे हा आनंद असतो तिथे नफा-तोट्याचे गणित असतच नाही. ज्यांना हे गणित करायचे असेल त्यांनी जरूर करावे, पण त्यांच्या व्यवसायाचा पाया जर छंदातून भरला गेला असेल तर कळस नफ्याचा करायचा की आनंदाचा हे ज्यांचे त्यांनी ठरवावे. मजा येते म्हणून काम करणाऱ्या लोकांना मी (थट्टेनं) छांदिष्ट म्हणतो. हा लेख मुख्यतः अशा छांदिष्टांबद्दल आहे.

उपयोगी छंद

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनवून आपल्या घरातच वापरता येणं हा आपल्या छंदाचा थेट उपयोग. ठराविक काळानंतर मोटार, दिवे, पाणी चालू-बंद करणारा टायमर, घरगुती पंख्याचा वेग कमी जास्त करणारा कंट्रोलर, लांबूनच टॉर्चच्या साह्यानं (एॅप न वापरता) इलेक्ट्रिकल वस्तू चालू बंद करता येण्यासाठी रिमोट कंट्रोल अशा अनेक साध्या सोप्या गोष्टी छांदिष्ट लोक बनवू शकतात.

किचकट सिद्धांतांवर काट मारा

होय ! इलेक्ट्रॉनिक्स हे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान आहे. पण छांदिष्टांना त्या मागच्या किचकट सिद्धांतांची, किचकट गणिताची गरज नसते. बहुतेक वेळा, ज्यांना शाळेतलं अंकगणित येतं त्यांना या छंदातली छोटी गणितं सहज सुटतात. एकदा का व्होल्टेज आणि करंट म्हणजे काय हे समजलं की बरीचशी सर्किट्स समजायला लागतात. सरावांनं वेगवेगळी सर्किटं "वाचता" येतात, योग्य त्या ठिकाणी योग्य ते शब्द वापरता येतात, इतरांवर छाप पाडता येते... आणि मग छांदिष्टपणा वाढतच जातो.

मोफत डिझाइन्स उपलब्ध

पण मी सुरुवात कुठून करायची ? या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे. तुमच्या घरात उपयोगी पडेल अशा काही सोप्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निवड करा. त्यापैकी बहुतेक सर्व वस्तू कशा बनवायच्या याची मोफत डिझाइन्स तुम्हाला इंटरनेटवर सापडतील. या दृष्टीनं इंटरनेट हा मोठा खजिनाच ठरतो. या डिझाइन्सपैकी एक सोपे, कमी खर्चाचे, कमीत कमी सुटे भाग असलेले डिझाइन निवडा. त्या भागांच्या किंमती इंटरनेटवरच तुम्ही पाहू शकता. काही वेळा अशा वस्तूंचे तयार किट देखील तुम्हाला इंटरनेटवर उपलब्ध होईल. पण तुमच्या गावात जर इलेक्ट्रॉनिक्सच्या सुट्या भागांचे दुकान असेल तर तिथूनच सुटे भाग विकत घ्या. अनेकदा कमी किंमतीत चांगला माल पारखून घेता येतो तो दुकानातच !

सुटे भाग व त्यांची माहिती सहज उपलब्ध

तुमच्या सर्किटसाठी लागणारे सुटे भाग, त्यांचा पूर्ण तांत्रिक तपशील पुरवणारी पुस्तके हे भाग बनवणाऱ्या कंपन्या इंटरनेटवर ठेवतात. सर्वांना ही पुस्तके मोफत उपलब्ध आहेत. ती पुस्तकं वाचायची आणि योग्य तऱ्हेनं तो भाग वापरायचा याची जबाबदारी अर्थातच छांदिष्टांवर राहते.

अवजड, महाग यंत्रणांची गरज नाही

कंपन्यांमधे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचं उत्पादन करण्यासाठी अतिशय किचकट, महागड्या यंत्रणा अनेकदा वापरल्या जातात. छांदिष्टांना या साऱ्याची गरज नसते. जनरल पर्पज पी.सी.बी. वापरणे किंवा सरळ हवेतच सोल्डरिंग करून विविध भाग जोडणे पुरेसे असते. या गोष्टी कशा करायच्या याचे (व्हिडिओ किंवा लेखी) धडे इंटरनेटवर मुबलक आणि मोफत उपलब्ध आहेत. तयार झालेलं सर्किट तपासण्यासाठी मल्टिमीटर सारखं सोपं आणि स्वस्त उपकरण छांदिष्ट वापरतात. जोडणी करताना झालेल्या चुका दुरुस्त करायला देखील सोपी आणि स्वस्त (डी-सोल्डरिंग पंप सारखी) अवजारं उपलब्ध असतात. छंद म्हणून सुरुवात करायला एक हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च अवजारे व यंत्रणाकरता येत नाही.

अति-कुशलतेची गरज नाही

सुट्या भागांची जोडणी करायला सोल्डरिंग चांगलं करता येणं हे एक कौशल्य इलेक्ट्रॉनिक्सच्या छांदिष्टांसाठी अत्यावश्यक आहे. जोडणी करताना चुका होतातच. त्या दुरुस्त करण्यासाठी डी-सोल्डरिंग (सुटे भाग सोडवणे) शिकावं लागतं. मल्टिमीटर वापरून व्होल्टेज आणि करंटची मोजणी करणं हे तिसरं कौशल्य मिळवलं की तुम्ही स्वतःला इलेक्ट्रॉनिक्सचे छांदिष्ट म्हणवून घेऊ शकता.

मोफत शिक्षण उपलब्ध

इलेक्ट्रॉनिक्सचे छांदिष्ट होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही क्लासची गरज नाही. तुमच्या सोयी सवडीनुसार अभ्यास करायला अक्षरशः हजारो व्हिडिओ धडे तुम्हाला इंटरनेटवर उपलब्ध आहेत. मी व्यक्तिगत रित्या व्हिडिओपेक्षा लेखी दिलेल्या (फोटोंसहित) सूचना-लेखांच्या बाजूनं आहे. विज्ञान केंद्राच्या वतीनं ज्याची हा छंद जोपासण्याची इच्छा आहे, त्याला इमेल वरून मार्गदर्शन करण्यात येते.

इतर छंदांशी तुलना

एकूणच छांदिष्टांनी अमुकच एक छंद जास्त चांगला असं म्हणू नये हे खरंच. तरी देखील इलेक्ट्रॉनिक्सच्या छंदाचं वेगळेपण काही औरच आहे. इलेक्ट्रॉनिक्सचा छंद नीटपणे जोपासला तर तो कदाचित उद्याला तुम्हाला तुमचं कार्यक्षेत्र मिळवून देऊ शकेल. रेझिस्टर, कपॅसिटर, आय.सी., ट्रान्सफॉर्मर, सोल्डरिंग, मीटर यांच्याशी नातं निर्माण झालं की मग त्या साऱ्यांमागचे नैसर्गिक नियम, सिद्धांत, गणित आपोआप आपल्यासमोर उलगडत जातं, त्यामागची जादू कळायला लागते, कधीतरी अचानक असं काहीतरी कोडं उलगडतं की अवर्णनीय असा आनंद होतो. यालाच साक्षात्कार म्हणतात का ?

#इलेक्ट्रॉनिक्स #ताजे लेखन