नेमेचि येतो मग पावसाळा...
हल्ली दरवर्षी शाळा कॉलेजातून विज्ञान दिन साजरा केला जातो. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीनं काही वैज्ञानिक प्रकल्प करावेत अशी अपेक्षा असते. कामाच्या धकाधकीतून वेळ काढून काही शिक्षक हे काम अंगावर घेतात देखील . काहींना ते न करण्याचा पर्याय नसल्यानं करावंच लागतं. विद्यार्थ्यांची स्थिती देखील फार वेगळी नसते. सब घोडे बारा टके हा नियम अनेक शाळा आपल्या विद्यार्थ्यांसाठी लावतात आणि विज्ञान प्रकल्पाचं लचांड या मुलांच्या मागे लागतं.
अशा एका साजऱ्या केलेल्या विज्ञान दिनाचा मी नुकताच साक्षीदार होतो. या लेखात मी पाहिलेल्या विज्ञान प्रकल्पांचे दोष मी वर्णन करून सांगणार नाही. शाळा कॉलेजातले विज्ञान प्रकल्प कसे असावेत (म्हणजे त्यांना मुळात विज्ञान प्रकल्प म्हणता येईल) आणि त्या प्रकल्पांची, प्रदर्शनांची उद्दिष्टं काय असावीत याबद्दल मी काही विचार मांडणार आहे. शिवाय अशा प्रकल्पांची उदाहरणं सांंगणार आहे.
विज्ञान प्रकल्प निवडताना पुढील गोष्टींचा विचार केला तर जास्त योग्य होईल.
- प्रकल्प वैज्ञानिक विषयावर असावा.
- प्रकल्प तयार करण्यासाठी १५ दिवस ते एक महिना वेळ मिळावा. या काळात विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या सहकार्याने स्वतः काम करावे.
- प्रकल्प हाती घेणाऱ्याला पेलेल असा प्रकल्प निवडावा. केवळ आज एखाद्या तंत्रज्ञानाची चलती आहे म्हणून ते वापरून काहीतरी(च) बनवायचे अशी वृत्ती नको.
- प्रकल्पाचा विषय विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमाशीच निगडित असेल असा हट्ट नको. साध्या, उपयुक्त प्रकल्पाला प्राधान्य द्यावे.
- प्रकल्प बनवताना ज्या अडचणी येतील, निरीक्षणे घेतली जातील, त्यांच्या नोंदी करून प्रकल्प अहवाल तयार करावा.
- ज्या प्रकल्पांत गणिती आकडेवारी गोळा करता येईल, निरीक्षणे व संख्या नोंदता येतील त्या प्रकल्पांना प्राधान्य दिले जावे.
- गोळा केलेल्याा आकडेवारीचे विश्लेषण करून त्यातून काही नियम (algorithm/hypothesis) तयार करता येतो का ते पाहून तसा प्रयत्न केला पाहिजे.
- जीवशास्त्र प्रकल्पांत दरवेळी संख्यांची नोंद करता येईलच असं नाही. पण हे प्रकल्प अहवाल विषयाच्या अनुरोधाने येणाऱ्या आकृतींनी (फोटो नव्हे) भरलेले असावेत. शक्यतो जीवशास्त्रीय नमुने गोळा करावेत.
- प्रकल्प अहवाल हाताने लिहिलेले असावेत. भाषेचे बंधन नाही.
- प्रकल्पात वापरलेल्या साहित्याच्या एकूण किंमतीवर बंधन असावे. अधिक महाग साहित्य असलेला प्रकल्प महान असतो असा चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी ही काळजी.
वर उल्लेख केलेल्या "नियमावलीत" विषय वैज्ञानिक असणे, भरपूर आकडेवारीने प्रयोग सिद्ध होणे आणि चांगला प्रकल्प अहवाल लिहिणे या तीन गोष्टींना महत्व दिले आहे ही गोष्ट वाचकांच्या लक्षात येईल. या नियमांत परिस्थितीनुरूप बदल करता येईल. पण विद्यार्थ्याला मिळणारा वैज्ञानिक अनुभव आणि त्यातून त्याने/तिने काढलेले निष्कर्ष हे साऱ्याचे उद्दिष्ट असायला हवे.
काही उदाहरणे
पुढे काही वेगळ्या खर्चिक नसलेल्या प्रकल्पांची उदाहरणे दिली आहेत. ही यादी वाढवता येईल. त्यात बसणारा प्रयोग तुम्ही केला असेल तर आकडेवारी सहित आम्हाला पाठवा.खेळण्याचे पत्ते वापरून अनेक खेळ, जादू करता येतात, ज्यात गणित आणि तर्कविचार यांचा वापर केलेला असतो.
उदा. एका आड एक पत्ता खाली टाकून प्रेक्षकांना दाखवण्याचे पत्ते एक्का, राजा, राणी, गुलाम अशा क्रमाने दुर्री पर्यंत येतात. हे करण्यासाठी प्रथम कोणत्या क्रमाने ते लावायला हवेत यामागे गणित आहे. ते प्रकल्प करणाऱ्याला सांगता येणे गरजेचे आहे.
प्रेक्षक कोणतीही दोन अंकी संख्या मनात धरतो आणि प्रकल्पकर्ता जास्तीत जास्त ८ प्रश्नांत ती संख्या ओळखतो.
प्रश्नसंख्या आठच का, याचं उत्तर विद्यार्थ्याला देता येणे गरजेचे. या प्रकल्पात विद्यार्थ्याचे गणन कौशल्य वाढीला लागते हे पहाता येते.
एका सुतळीच्या एका टोकाला छोटा दगड बांधून एक लंबक (pendulum) तयार करता येईल.
सुतळी वेगवेगळ्या ठिकाणी धरली तर लंबकाची लांबी बदलते आणि त्यानुसार एका झोक्याचा वेळ बदलतो. एका झोक्याचा वेळ आणि सुतळीची लांबी यांचा गणित संबंध आपल्याला माहिती आहे. आता १०० झोक्यांना किती वेळ लागतो हे दुरून पाहून ठरवायचे व गणिताचा वापर करून दोरीची लांबी किती असेल याचा अंदाज सांगायचा. ही एक जादू म्हणूनही प्रेक्षकांना दाखवता येते. गणिती कौशल्य, भौतिकशास्त्राचे ज्ञान वापरून हा प्रयोग करता येतो.
मुलांना धनुष्यबाण खेळायला आवडतो. या खेळातून उत्तम प्रकल्प बनवता येईल.
धनुष्य उभे (जमिनीच्या प्रतलाच्या अनुषंगाने) धरल्यावर धनुष्याच्या दोरीचा जमिनीशी असलेला कोन बदलून बाण किती दूर जातो याच्या अनेक नोंदी केल्या की जमिनीवरून जमिनीवर टाकण्याच्या प्रक्षेपणास्त्राच्या गतीचा अभ्यास करता येईल. इंग्रजीत ज्याला Trajectory म्हणतात त्या मार्गाचा हा अभ्यास . धनुष्याची दोरी किती ताणली हे कळण्यासाठी बाणावरच एकेका सेंटिमीटर वर खुणा कराव्या लागतील.
जीवशास्त्राच्या प्रकल्पांसाठी कीटकांचा अभ्यास खूपच सोयीचा आणि कमी खर्चाचा. केवळ एक भिंग आणि आकृती काढण्यासाठी पेन्सिल-कागद असले की झाले.
जीवशास्त्राच्या अभ्यासात नमुने गोळा करणं महत्वाचं असतं. त्यासाठी हा प्रकल्प चांगला ठरेल. अनेक प्रकारचे कीटक पाहून त्यांचं वर्गीकरण करणं हा प्रकल्प उत्तम ठरेल.
मार्गदर्शन
अशा प्रकल्पांसाठी शिक्षकांनी मार्गदर्शन करणं आवश्यक असतं. पण सर्वच प्रकल्पाच्या विषयांचा शिक्षकांनी सखोल अभ्यास करावा ही अपेक्षा ठेवता येणार नाही. त्यासाठी चांगल्या दर्जाच्या पुस्तकांचं वाचन हवं. असं एक पुस्तक सुचवायला मला नक्की आवडेल. श्री. अरविंद गुप्ता यांनी लिहिलेली अशी पुस्तक मालिकाच आहे. त्यांच्या पुस्तकांत अगदी कमी खर्चात करता येणाऱ्या प्रकल्पांचा समावेश होतो.
इंटरनेटवर अशा प्रकल्पांचं मार्गदर्शन घेणं सोयीचं असतं पण त्यातल्या माहिती विषयी आपण जागरूक राहिलं पाहिजे. ही माहिती पडताळून पहाण्याची प्रकल्प करणाऱ्याची जबाबदारी असते. इंटरनेटवर माहिती मिळेल पण ज्ञान आपल्यालाच मिळवावं लागेल याचं भान विद्यार्थी आणि शिक्षकांनी ठेवलं पाहिजे.
स्पर्धा की सहकार्य ?
विज्ञान प्रकल्पांची स्पर्धा घेण्यात फार वाईट काही नाही. परंतु विषयाचं ज्ञान , अनुभव आणि प्रकल्प स्वतः करताना मिळालेला आनंद हे खरं बक्षिस आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला हवं आणि शिक्षकांनी त्याची जाणीव करून द्यायला हवी. हा भाग आज सर्वात जास्त कठीण आहे हे मला मान्य आहे.
नेमेचि येतो मग पावसाळा...
नेमेचि येतो मग पावसाळा ।। हे सृष्टिचे कौतुक जाण बाळा ।।
असं जुनं वचन आहे. पावसाळ्याचा उपयोग करून पिण्याचं पाणी आणि पिकांसाठी पाणी मिळवता आलं नाही तर तो पावसाळा वाया जाणार नाही का?
विज्ञान दिन साजरा करताना आपण जर त्यातून अनुभव आणि ज्ञान मिळवण्याचं (जे थोडं कष्टप्रद आहे हे खरंय) ध्येय ठेवलं तर हा सण वाया जाणार नाही. पुढची पिढी अनुभवानं प्रयोगातून पडताळा पहात मिळणाऱ्या ज्ञानानं समृद्ध झाली पाहिजे. तरच उद्या चॅट-जीपीटी बरोबरच्या स्पर्धेत त्यांना उतरता येईल. नाहीतर बहुराष्ट्रीय कंपन्यांसमोर भिक्षापात्रं घेऊन रांगा लावण्याची वेळ येणार आहे.
संपर्क
आमच्याशी संपर्क साधाःContact us here:

लेखकः विज्ञानदूत, तारीखः Friday 02 December 2022 04:27:28 PM IST