ऐसी अक्षरे…

या लेखाचे शीर्षक पाहूनच, हा लेख चुकून विज्ञान विभागात आला असावा अशी वाचकांना शंका येऊ शकेल. पण तसे काही नाही. अक्षरे केवळ पुस्तक-वह्यांत महत्वाची असतात असे नाही. ती इंटरनेटवरही महत्वाची असतात हे आज वेगळे सांगावे लागेल. नव्या पिढीला तर नक्कीच. कारण वाचण्यापेक्षा ऐकणे आणि चित्रे व चित्रफिती पहाणे हेच आज करमणूक, माहिती आणि ज्ञान संपादनाचे साधन जनसामान्यांनी केले आहे. आमच्या पिढीला ऑडिओ आणि व्हिडिओच आवडतात असं ठरवून तरुणाईने तर हे तारुण्याचे लक्षणच आहे असा गैरसमज करून घेतला आहे.

जी गोष्ट तरुणाईची, तीच साध्या माणसांची. साधी माणसे नेहमीच कुवतीने कमी असतात असे नाही, पण त्यांनी इंटरनेटवरच्या सोयी आपल्या भल्यासाठीच आहेत असा भाबडा गैरसमज करून घेतलेला असतो. त्यामुळे खोलात, तपशिलात न शिरता, जे जे (मोफत) मिळेल ते त्यांनी निमूटपणे स्वीकारलेले असते.

अशा तरुणाईला आणि साध्या माणसांना उद्देशून मी या लेखात लिहिणार आहे- अक्षर-माहात्म्याबद्दल…

पुस्तक आणि सिनेमा

माझे वडील खूप वृद्ध झाल्यावर सिनेमा किंवा मालिका पहाताना गोंधळून जात असत. अचानक उपटणारी गाणी, फ्लॅशबॅक या सारख्या तंत्रांमुळे त्यांचा हा गोंधळ होई. त्यात महत्वाचा भाग होता तो सिनेमा ज्या गतीने पुढे जाई त्याचा. रोझेस इन डिसेंबर सारखी जाडजूड पुस्तके मात्र त्यांनी त्याच काळात सहजी वाचून काढली. हा प्रश्न वयाचा आहे असे काही जण म्हणतील. पण पुस्तक वाचताना आपल्या समजशक्तीचा वेग आणि वाचनाचा वेग यांचा मेळ आपण स्वतः घालू शकतो. तसे सिनेमा पहाताना होत नाही. कारण सिनेमा पहाण्याचा वेग दिग्दर्शक ठरवतो, प्रेक्षक नाही!

पण प्रचंड वेग म्हणजे प्रगतीचे लक्षण, असा जर आपण समज करून घेतला, तर सिनेमा हाच आकर्षक वाटू लागतो. माहिती किंवा विशेषतः ज्ञान मिळवायचे असेल तर सिनेमाचा उपयोग होणार नाही. म्हणून पुस्तक हेच ज्ञान मिळवायला आधिक सोयीचे असते.

जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांचे Treaties in Electromagnetics हे पुस्तक जेव्हा मी वाचले, तेव्हा या पुस्तकात अगदी गरज वाटली तरच आकृती देण्याचा प्रघात ठेवलेला आढळला. शंभर वर्षांपूर्वी, अत्यंत मूलभूत असे सिद्धांत मांडणारे शास्त्रज्ञ मॅक्सवेल यांना “हजार शब्दांपेक्षा एक चित्र अधिक प्रभावी असते” ही उक्ती ठाऊक नसेल असे वाटत नाही. पण त्यांनी देखील अत्यंत अर्थगर्भ विषय मांडताना आकृतींचा सढळ वापर केलेला नाही. गणितावर मात्र भर दिला आहे.

जी तुलना पुस्तक आणि सिनेमाची तीच, इंटरनेटवरच्या शब्दाक्षर-प्रबल साइट्स आणि व्हिडिओ-ऑडिओ साइट्सची !

ऑडिओ व्हिडिओ साइट्स

गेल्या काही वर्षांत ऑडिओ-व्हिडिओज् असलेल्या संकेतस्थळांचे प्राबल्य वाढताना दिसते आहे. जीवनाला आलेला प्रचंड वेग हे त्याचे महत्वाचे कारण असावे. विशेषतः तरूण पिढीला आपण घाईने काही केले नाही तर शर्यतीतून मागे पडू असे वाटते. अशी असुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात बड्या कंपन्या यशस्वी झालेल्या मला दिसतात. पण हीच घाई विशेषतः शिक्षण घेताना परवडत नाही हे या तरुणांच्या लक्षात आले आहे असे वाटत नाही. “अति घाई संकटात जाई” हे ट्रकच्या मागे लिहिण्याचे वाक्य तरुणांनी खऱ्या आयुष्यातही लक्षात ठेवायला हवे.

काही तांत्रिक तपशील

दृक्-श्राव्य संकेतस्थळांवरच्या बऱ्याचशा चित्रफितींचे क्षुद्र विषय आणि सुमार गुणवत्ता हे भाग वगळले तरी तांत्रिक दृष्टीनेही चित्रफिती पहाणे अकार्यक्षम ठरते. एक उदाहरण पाहूया. (संदर्भ)

  • मांजरांच्या गमती दाखवणारी एक यूट्यूब चित्रफीत १५०.६ MB या आकाराची आहे (१MB=दहा लाख बाइट्स ).
  • ती १० मिनिटे १६ सेकंद इतका वेळ चालते. आपल्या संगणकावर (किंवा मोबाइलवर) ही फाइल उतरवून घ्यायला (12 Mb/s वेगाने) सुमारे १०० सेकंद लागतात.
  • याच आकाराची केवल-ध्वनी-युक्त (audio) फाइल सुमारे ३१२ मिनिटांची माहिती पुरवते.
  • हीच फाइल जर केवल-शब्दाक्षर-युक्त (text only) असेल तर तिच्यात अडीच कोटी इंग्रजी शब्द, (किंवा सव्वा कोटी मराठी शब्द) मावतात.
  • म्हणजेच या केवल-शब्दाक्षर-युक्त फाइलमधे नेहमीच्या आकाराच्या पुस्तकाची (paperback) ४० हजार इंग्रजी पाने मावतील.
  • १५०० शब्दांचा एक लेख असे केवल-शब्दयुक्त ११००० इंग्रजी लेख संकेतस्थळावर मावतील.
  • हे लेख शांतपणे १६० शब्द प्रतिमिनीट या दराने वाचले तर सुमारे १७०० तास लागतील.

याचा अर्थ असा होतो की, माणसाच्या मेंदूत जितकी माहिती एक चित्रफीत भरते तिच्या ३० पट माहिती ध्वनिफीत भरते आणि सुमारे दहा हजार पट माहिती शब्दयुक्त लेख भरतो. हे सर्व संगणकात सारखीच जागा व्यापतात. पण संगणकाच्या स्मृतीकक्षाची काळजी कोणी आणि का करावी ? भरपूर मोठ्या प्रमाणात, आणि स्वस्तात, अशी मेमरी उपलब्ध आहे. याचे उत्तर माणसाच्या मनोभूमिकेत आहे. जेव्हा अशी डिजिटल साठवण करता येते हे माहिती झाले तेव्हापासून आतापर्यंत या उधळ्या मनोभूमिकेमुळे अपार ऊर्जा, पैसा उधळला गेला, वाया गेला. यातला ऊर्जेचा मुद्दा सर्वात जास्त लक्षात घेण्यासारखा आहे. ऊर्जेच्या उधळपट्टीत इंटरनेटचा वाटा सिंहाचा आहे हे सर्वश्रुत आहे. विशेषतः स्वच्छ पर्यावरणाच्या पाठिराख्यांनी केवळ-शब्द-युक्त संकेतस्थळांची बाजू उंच उचलून धरायला हवी.

तुरुंगातील बगीचा

तरुणाईच्या आणि साध्या माणसांच्या अडाणीपणाचा सर्वात मोठा गैरफायदा उठवला आहे तो फेसबुक, एमेझॉन, यूट्यूब या सारख्या बड्या धेंडांनी. त्यांनी त्यांच्या वेबसाइट्स आरेखित करताना मानसशास्त्र, संगणकशास्त्र आणि कला यांचा संगम वापरून लोकांना (आपापल्या साइट्सवर) खिळवून टाकले आहे. चित्रफिती, ध्वनिचित्रे यांचे संमोहनास्त्र वापरल्याने हा तुरुंग तरुणाईला आणि साध्या माणसांना बगीचा वाटू लागतो. त्याचे वर्णन इंग्रजीतwalled garden असे केले जाते.

हा तुरुंग आहे, पण त्यातल्या कैद्यांनी त्या तुरुंगात स्वेच्छेने प्रवेश केलेला असतो. त्यात मिळणाऱ्या तथाकथित मोफत सुखसोयींसाठी स्वतःची पूर्ण माहिती, आपल्या सवयी, आवडी-निवडी, अगदी फोटो, ध्वनिचित्रांसकट देऊन स्वतःचा खाजगीपणा त्यांनी नष्ट करून घेतला आहे. ही माहिती आता त्या कंपन्यांच्या मालकीची आहे, या कंपन्या ही माहिती विकून गबर होत आहेत याचेही त्यांना भान नाही.
बगीचा भासणाऱ्या या तुरुंगात प्रवेश करण्याआधी कंपन्यांनी Terms And Conditions of Services त्यांना स्पष्ट शब्दांत सांगून, मला हे मान्य आहे हे त्यांच्याकडून मान्य करून घेतले आहे. (हे देखील अनेकांना माहिती नाही कारण शब्दांतला मजकूर वाचतो कोण?) ही माहिती कोणा-कोणाला विकली जाते यावर कंपन्या वगळता कोणाचेही नियंत्रण नाही. रिचर्ड स्टॉलमन हे बहुचर्चित (free software) मुक्त प्रणालींचे प्रणेते म्हणतात, त्या प्रमाणे हे लोक या साइट्सचा वापर करीत नाहीत, तर त्या साइट्सच त्यांचा वापर करताहेत. इंटरनेट सारख्या प्रभावी माध्यमाचे मूठभर लोकांनी अपार आणि अन्याय्य नफा कमावण्याच्या व्यवस्थेत रुपांतर करण्यात दोषपूर्ण सहभाग लोकांचाच आहे हे मान्य करावे लागते.

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने…

परिस्थिती गंभीर आहे पण सारेच लोक काही निराश, निष्क्रीय नाहीत. साध्या लोकांचे मतपरिवर्तन होऊन त्यांची तुरुंगातून सुटका होईपर्यंत वेळ जाईल. तोवर समांतर व्यवस्था उभी केली जाते आहे. किंबहुना ती पूर्वी अस्तित्वात होतीच. अगदी सुरुवातीला जे इंटरनेट अस्तित्वात होते त्यात (प्राथमिक तंत्रज्ञानामुळे) शब्द-प्राबल्य असलेल्या लेखांचाच भरणा होता. हे लेख तंत्रज्ञानाशी थोडीशी ओळख असलेले लोक लिहीत होते. आज स्टॅटिक साइट जनरेटरच्या मदतीने अनेक लोक शब्दप्राबल्य असलेल्या साइट्स निर्माण करत आहेत. त्यात तंत्रविशारदांची संख्या आज तरी जास्त आहे. मातारोआ सारख्या मुक्त संकेतस्थळावर विनाअट, स्वतःचे म्हणणे साधा माणूसही सहजतेने शब्दांत मांडू शकतो.

अशा मुक्त संकेतस्थळांवर तुमचे शब्दप्रबल लेखन अनेकांपर्यंत पोहोचावे म्हणून बड्या शोध इंजिनांची वाट पहावी लागत नाही. आणि बड्या शोध इंजिनांना तुमच्या लेखनात रसही नाही. तुम्ही त्यांना जाहिरातीचे पैसे दिलेत तर तुमचा सुमार लेखही इंजिने वर आणतात ही वस्तुस्थिती आहे. स्वतःची अशी मुक्त संकेतस्थळे निर्माण करणारे लेखक इतरांच्या साइट्सच्या लिंक्स स्वतःच्या लेखात टाकतात. अवघे धरू सुपंथ हा मंत्र आचरणात आणत अशा शब्द-प्रबळ संकेतस्थळांची स्वतंत्र जाळे-व्यवस्था निर्माण होते आहे. अगदी कमी वेगाचे इंटरनेट वापरू शकणाऱ्या लोकांपर्यंतही त्वरेने हे लेखन पोहोचते.

मराठी वाचकांना ज्ञानेश्वर आणि तुकारामांची ओळख करून द्यावी लागू नये. आपल्याला काही मांडायचे आहे असे ज्यांना वाटते त्यांनी तुकोबांचा अभंग आठवावा.

आम्हा घरी धन, शब्दाचीच रत्ने
शब्दाचीच शस्त्रे, यत्न करू
शब्दचि आमुच्या, जीवाचे जीवन
शब्दे वाटू धन, जन लोकां…
–संत तुकाराम

रसिक वाचकांचे प्रबोधन करण्यात अमृतालाही मागे टाकणारी शब्दकळा घडवतील “ऐसी अक्षरे रसिके…मेळवीन”, असे वचनही ज्ञानियांचा राजाच देऊ जाणे. आपल्या सारख्यांनी अर्थपूर्ण लेख लिहावेत, या लेखात अर्थपूर्ण शब्द वापरावेत, प्रत्येक शब्द अक्षरांनी (जे झिजत नाही तेः अ-क्षर) निर्माण व्हावा. आपल्यावर रसिक शोधण्याची वेळ येईल, पण त्यासाठी शब्दाक्षर-प्रबल लेखन करून अगदी मंद वेगाने चालणाऱ्या इंटरनेटवरही तळातल्या रसिकांपर्यंत ते वेगाने पोचवावे. ऐसी अक्षरे लिहावी….

This entry was posted in विज्ञान तंत्रज्ञान. Bookmark the permalink.