समाज-माध्यमे म्हणजे गर्दीच्या शोधात असणारे गरजू लेखक एकत्र येण्याची जागा.. या “लेखकांचा” स्वभाव समाज माध्यमे ठरवतात.. आणि नंतर त्या “लेखकांची” माहिती (कोणाकोणाला कोण जाणे) विकून या कंपन्याच बहु-अब्जाधीश होतात. लेखकांची माहिती न विकणाऱ्या काही साइट्स आहेतही, पण त्या साइट्सना स्वतःचा “स्वभाव” नाही.
म्हणून अनेकांनी एकत्र येऊन निर्माण केलेल्या संकेतस्थळांची या ठिकाणी दखल घेतलेली नाही. स्वतःचे विचार ठामपणे मांडणारे लोक स्वतःच्या व्यक्तित्वाचा ठसा आपल्या संकेतस्थळावर उमटवतात. ही संकेतस्थळे मुख्यतः व्यक्तिगत आहेत. त्यामुळे या संकेतस्थळांना “स्वभाव” आहे. काही संकेतस्थळे मराठीत आहेत. मराठी पेक्षा इंग्रजी संकेतस्थळांची संख्या अधिक आहे हे ओघाने आलेच. अशा संकेतस्थळांची इथे नोंद करताना, त्या ठिकाणी जाहिराती नसतील अशी कसोटी मी ठेवली आहे. पण “स्वभाव” फारच वेगळा आणि ठाशीव असेल तर मात्र जाहिरातीची कसोटी तात्पुरती स्थगित करतो.
समाज माध्यमे आणि गूगल सारखी शोध इंजिने (खरे तर जाहिरात इंजिने) हातात हात घालून त्यांना सोयीच्या नसलेल्या साइट्स पहिल्या पानावर येऊ देत नाहीत हे अनेकांनी अनुभवले आहे. त्या शिवाय अनेक साइट्सवर सतत मधे घुसणाऱ्या जाहिराती (pop-ups) अत्यंत त्रासदायक असतात. ज्या वेळी साइट पूर्णपणे html वापरून केलेली असते त्यावेळी cookies सुद्धा पाठवल्या जात नाहीत. वाचकांची माहिती अजिबात गोळा न करणाऱ्या संकेतस्थळांना या पानावर प्राधान्य दिले आहे. मात्र अशा साइट्सवर तुम्हाला चकचकीत गोष्टी दिसणार नाहीत याची मानसिक तयारी ठेवलेली बरी !
गर्दीच्या शोधात नसलेले लेखक…
- Free Softwareचे अध्वर्यु रिचर्ड स्टॉलमन यांची साइट- अत्यंत माहितीपूर्ण साइट. संगणक व संगणकीय स्वातंत्र्य या बद्दलचे प्रगल्भ विचार. राजकीय विषयांवर मल्लीनाथी. साइट English मधे.
- सिंप्लिफायर. या संकेतस्थळाबद्दल मी पूर्वी एक स्वतंत्र लेख लिहिला आहे. हा एक अनामवीर आहे. इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल अशा अनेक वस्तूंचा निर्माता. ही English site आहे.
- Linux terminal applications आणि आणखी Linux terminal applications. लिनक्स टर्मिनलवर अतिशय वेगाने चालणाऱ्या विविध बहुगुणी सॉफ्टवेअर्स बद्दल दिलेले अभिप्राय. ही English site आहे.
- इलेक्ट्रॉनिक्स पासून वेबडिझाइन पर्यंत.. एका वेबसाइट डिझायनरने Drupal वापरून तयार केलेली स्वतःची साइट, हिंदी आणि इंग्रजीत.
- अक्षरयोगिनी- मुक्तपणे व मोफत वापरता येईल असा देवनागरी Font. साइट मराठी व इंग्रजीत.
- बिनधास्त- विविध विषयांवर बिनधास्त भाष्य. साइट मुख्यतः मराठीत.
- चित्ररेखा- व्यक्तिगत अनुभव व भाष्ये. साइट मुख्यतः German व मराठीत.
- निम्न-तंत्रज्ञान मासिक (Low Tech Magazine)- साधे वा पुरातन तंत्रज्ञान या संबंधी लेखन. साइट English मधे.
- चिक्कू माणसाचा संगणक- अत्यंत माहितीपूर्ण साइट. संगणक व संगणकीय स्वातंत्र्य या बद्दलचे प्रगल्भ विचार. साइट English मधे.
ही यादी अशीच वाढत राहील. आणि हे पान नेहमी ताजे ठेवील! कदाचित तुमचे संकेतस्थळ (वेबसाइट) या यादीत उद्या दिसू शकेल !!
तुमची स्वतःची साइट
तुम्हाला काही सांगायचंय ? तर मग तुमच्या “स्वभावा”ला अनुसरणारी स्वतःची साइट तुम्हीच बनवा! आणि बनवाच !! समाज-माध्यमांच्या चकचकीत आणि मायावी तुरुंगातून बाहेर पडा. त्या साठी वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत. या चारपैकी कोणत्याही मार्गाने जाताना, मजकूरच खरी गुणवत्ता ठरवतो (content is the king) हे मात्र ध्यानात असू द्या.
- तुमचे म्हणणे साध्या शब्दांत आणि फोटोंसह मांडू शकाल अशी वेगाने प्रकट होणारी साइट तुम्ही निःशुल्क बनवू शकता.- पण थोडेसे (तासभर) शिकावे लागेल. या साइटवर जाहिराती दाखवल्या जात नाहीत. सदस्य होण्यासाठी तुमची कोणतीही माहिती येथे विचारली जात नाही.
- तुम्हाला html, javascript येत असेल तर (येत नसेल तर सुमारे ४ तास शिकून) तुमची वेगाने प्रकट होणारी, जाहिरातमुक्त साइट निःशुल्क बनवू शकता. नव्या शहरात…(@neocities) तुमची (इमेल व्यतिरिक्त) कोणतीही व्यक्तिगत माहिती येथे विचारली जात नाही.
- कोणतेही प्रोग्रामिंग न करता (किंवा न शिकता) तुम्ही तुमची निःशुल्क वेबसाइट इथे बनवू शकता. मात्र निःशुल्क वेबसाइटवर कंपनी जाहिराती दाखवते. तुमचे विचार, निर्मिती आणि तुमची माहिती तुमचीच राहते असे ही कंपनी स्पष्टपणे सांगते. तुम्ही तुमच्या या साइटवर ध्वनि, चित्रफिती देखील दाखवू शकता (त्यासाठी वैध पण आडमार्गाने जावे लागते). आणखी सोयी मिळवायच्या असतील (उदा. जाहिराती नाहीत, भरपूर सर्व्हर स्पेस) तर थोडा खर्च करून त्या मिळवता येतील.
- स्वतःची वेबसाइट बनवण्यासाठी वर्डप्रेस सारखे मुक्त (आणि मुफ्त) सॉफ्टवेअर वापरून उच्च गुणवत्ता असेलेली साइट तुम्हाला बनवता येते. मात्र मजकूरच खरी गुणवत्ता ठरवतो हे लक्षात घ्या. यासाठी तुम्हाला थोडा खर्च (आजच्या हिशेबाने दरवर्षी सुमारे २००० रु.) येईल.
सशुल्क असो वा निःशुल्क, स्वतःची साइट बनवली की वाचक कसे मिळणार हा लाख मोलाचा प्रश्न असतो. त्याचे उत्तर आहे… थोडा धीर धरा. वेबरिंग, लिंक्स डिरेक्टरीज् आणि माझ्या या संकेतस्थळासारख्या ठिकाणी तुमच्या साइटची लिंक आली की मग सर्च इंजिनांवर तुम्हाला अवलंबून रहावे लागत नाही. एकदा तुमची साइट तयार झाली की इतरांच्या व्यक्तिगत साइटच्या लिंक्स तुम्ही तुमच्या साइटवर टाकू शकता ! काही वर्षे धीर धरलात तर सर्च इंजिनांना देखील तुमची दखल घ्यावीच लागेल !
तुम्हाला वरीलपैकी एखादा मार्ग वापरून स्वतःची साइट बनवायची असेल, किंवा काही शंका असतील तर आमच्याशी जरूर संपर्क साधा.