विज्ञान सर्वांसाठी -५

“विज्ञान सर्वांसाठी” या विषयावर मी काही काळापूर्वी रेडिओ इन्फिनिटी या कम्युनिटी रेडिओवर जी आठ व्याख्याने दिली ती क्रमाने येथे देत आहे. हे माझं पाचवं व्याख्यान.

ऐका…

मात्र तुम्हाला हे व्याख्यान वाचायचं असेल तर तुम्ही ते इथेच वाचू शकता. ते भाषण लिखित रूपात पुढे दिलं आहे.

विज्ञान कथा

माझा या व्याख्यानाचा विषय आहे – विज्ञान कथा. विज्ञान या शब्दाचा अर्थ विज्ञान-तंत्रज्ञान-गणित असा घेतला पाहिजे हे तुम्ही पहिल्या व्याख्यानात ऐकलंत. त्या अर्थाला अनुसरूनच विज्ञान कथा या आजच्या विषयाचा मी विचार करणार आहे.

विज्ञान कथेत विज्ञान हवंच

आमचा एक मित्र चिंगूशेटच्या हॉटेलात गेला आणि तिथं त्यानं पुरणपोळी मागवली. मित्राची तक्रार होती की या पुरण पोळीत पुरणच नाही. चिडलेला मित्र तिथून सरळ एका चित्रपटगृहात गेला. चित्रपट होता I Robot. हा चित्रपट मात्र या मित्राला फार आवडला. अँनिमेशन केलेला यंत्रमानव आणि भरपूर हाणामारी दाखवायची की वैज्ञानिक चित्रपट झाला असं निर्मात्यांचं मत असावं. आमच्या मित्राचंही तसंच मत झालं. अनेक लोकांना हेच पटतं. पण पुरणपोळीत पुरण हवंच असा हट्ट धरणारे लोक विज्ञानकथेत विज्ञान हवंच ही गोष्ट मात्र मान्य करत नाहीत.

हिरव्या रंगाची त्वचा, डोक्यावर दोन अँटेना, दणकट असे हात पाय आणि मागे-पुढे एकेक डोळा असणारा प्राणी अशी कल्पना केली की विज्ञानकथा लिहिता येते असं नाही. आपण जिला विज्ञानकथा म्हणणार त्यात विज्ञान असायलाच हवं. तुम्ही जर I Robot हा चित्रपट पाहिला असेल तर त्याला अँक्शनपट म्हणावं लागेल. पण विज्ञानाचा त्यात फारसा संबंध ठेवलेला नाही. मात्र तो बेतला आहे प्रख्यात विज्ञानकथा लेखक आयझॅक असिमॉव्ह यांच्या I Robot या पुस्तकावर. या पुस्तकात महत्वाचे आहेत ते यंत्रमानवांसाठीचे तीन नियम. या नियमांमागची कारणं आणि त्यामागचं विज्ञान. हे पुस्तक मात्र अत्यंत मनोरंजक आहे.

पाश्चात्य देशात विज्ञान कथा

पाश्चात्य देशात विज्ञान पहिल्यापासून अधिक विस्तारलं. विज्ञान-विचारांसाठी, गरज पडली तेव्हा, काही वैज्ञानिकांनी प्राणाचंही मोल दिलं. या अग्निदिव्यातून विज्ञान तावून सुलाखून बाहेर पडलं, आणि लोकांना त्याची किंमतही कळली. पुढे लोकांचं मनोरंजन करण्यासाठी काही शास्त्रज्ञांनी कल्पनेच्या भराऱ्या मारल्या. त्यातून विज्ञान नवलकथा तयार झाली. एकोणिसाव्या शतकात तर अक्षरशः हजारोंनी विज्ञानकथा लिहिल्या गेल्या. काही ठिकाणी तर फक्त विज्ञान कथांची मासिकंही निघाली, आणि भरपूर खपली. H.G.Wells, Issac Assimov हे प्रसिद्धीच्या शिखरावर गेलेले विज्ञानकथा लेखक.

इंग्रजी विज्ञान कथा

H.G.Wells यांची एक विज्ञान कथा आहे. “The Truth About Pyecraft”.

फॉरमॅलिन आणि पायक्राफ्ट हे एकाच क्लबचे सदस्य. त्यांची ही गोष्ट. श्री. फॉरमॅलिन हे गृहस्थ त्यांना नेहमी त्रास देणाऱ्या पायक्राफ्ट या लठ्ठ सदस्याला एक भारतीय जडीबुटी देतात. त्यामुळे पायक्राफ्टच्या शरिरात बदल घडतो. त्याचं वजन कमी व्हायला लागतं. पण ते वेगळ्याच पद्धतीनं. ही जडीबुटी पायक्राफ्ट च्या शरीरावर असणारं पृथ्वीचं गुरुत्वीय बल- gravitational force कमी करतं. त्यामुळे पायक्राफ्टचा लठ्ठपणा कमी न होता त्याचं वजन कमी होतं. शेवटी तर तो हवेत तरंगून छतालाच चिकटतो.

असं औषध आज तरी अस्तित्वात नाही. पण विज्ञानकथा अशा कल्पनाशक्तीला परवानगी देते आणि कथा मनोरंजक बनते. अशा कथेत विज्ञानाचं एखादं तरी तत्व निश्चित हवं शिवाय कल्पनाशक्तीचा आविष्कारही हवा. तरच तिला विज्ञानकथा म्हणता येतं.

 

तांत्रिकदृष्ट्या काय शक्य आहे त्याचं भान राखत कल्पना करणं आणि त्याची योग्य शब्दात मांडणी करणं हा विज्ञानकथेचा गाभा ठरतो. Twenty Thousand Legues Under the Sea ही ज्यूल व्हर्न यांची विज्ञान कादंबरी. कॅप्टन निमो आणि त्याची पाणबुडी नॉटिलस यांनी समुद्राच्या पाण्याखाली केलेला सुमारे ८० हजार कि.मि. चा प्रवास हा या विज्ञान-कादंबरीचा विषय आहे. असं म्हटलं जातं की १८७० साली प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीतील वर्णनामुळे प्रेरित होऊन वैज्ञानिक-तंत्रज्ञांनी खऱ्या पाणबुडीच्या तंत्रज्ञानात सुधारणा केल्या.

आयझॅक असिमॉव्ह हे तर वैज्ञानिक आणि विज्ञानकथा लेखक दोन्ही होते. यांच्या अनेक विज्ञानकथा प्रसिद्ध आहेत. त्यातल्या “Foundation Triology” सारख्या कादंबऱ्यांमधून राजकारणाबरोबरच, मानवाचं विविध विश्वांत पसरणं, भविष्यातल्या विज्ञान-तंत्रज्ञानाचा कल्पनाशक्तीच्या जोरावर घेतलेला वेध आणि मानसशास्त्रीय विश्लेषण या साऱ्या गोष्टींचा विचार होतो.

मराठी विज्ञान कथा

भारतीय साहित्यिकांनी आजवर विज्ञानकथेकडे फारसं लक्ष दिलेलं दिसत नाही. आपल्या देशाला विज्ञान-वृत्तीची परंपरा नाही त्याचा हा परिणाम असू शकेल. आपल्या शिक्षणाचेही आर्ट्स-सायन्स-कॉमर्स असे कप्पे आपण पाडले आहेत. एका प्रवाहातल्या व्यक्तीनं दुसऱ्या प्रवाहात पोहायचेच नाही असा कायदा नसला तरी मनोभूमिका मात्र तयार केली गेली आहे. त्यामुळे जीवन-साहित्य निर्माण करणारे लेखक विज्ञाना पासून दूर राहतात, आणि विज्ञानात मुशाफिरी करणारे मनोरंजन करण्यापासून दूर राहतात. हल्ली तर कॉमर्स क्षेत्रातही इतकी क्रांती तंत्रज्ञानामुळे झाली आहे की त्या क्षेत्राशी निगडित विज्ञानकथा नक्कीच मनोरंजक आणि प्रेरक ठरेल.

आता सांगितलेल्या परिस्थितीला अपवाद मात्र आहेत. काही मोजक्या मराठी लेखकांनी या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. डॉ. बाळ फोंडके, निरंजन घाटे अशा लेखकांच्या विज्ञानकथा आणि कादंबऱ्यांनी जुन्या-नव्या पिढीला मोहवून टाकले आहे आणि प्रेरणाही दिली आहे. गूढकथा लिहिणारे नारायण धारपही काही विज्ञानकथांचे धनी आहेत.

डॉ. जयंत नारळीकरांनी मराठीत विज्ञानकथा खऱ्या अर्थानं लोकप्रिय केली. अनेकांना प्रेरणा दिली. त्यांच्या कथा कादंबऱ्यांनी मराठी वाचकाला विज्ञानाभिमुख बनवलं. विज्ञानाचे विद्यार्थी जेव्हा कल्पनाशक्तीचा वापर करून नव्या युगाच्या विज्ञानकथा लिहितील तेव्हा तेच या साऱ्या प्रेरकांना केलेलं अभिवादन असेल.

वामन परत न आला, यक्षांची देणगी, अभयारण्य, व्हायरस, प्रेषित, अंतराळातील भस्मासूर, टाईम मशीनची किमया, उजव्या सोंडेचा गणपती अशी विज्ञानकथा कादंबरी नारळीकरांनी लिहिली आहे. हे सर्व लेखन मराठीत आहे. केवळ करमणूक करण हा त्या कथा, पुस्तकांचा हेतू नाही. मराठी वाचकांनी विज्ञान समजून घ्यावे, यासाठी त्यांनी दिलेली ती देणगी म्हणता येईल. आपण ही पुस्तकं जरूर वाचली पाहिजेत.

करमणूक, प्रबोधन, प्रेरणा

चांगल्या शिक्षणाचं एक तत्व आहे. शिक्षण घेताना विद्यार्थ्याला मजा वाटली पाहिजे. विज्ञान शिकवताना विज्ञानकथांचा वापर केला तर त्यातली तत्वं समजायला सोपी जातील. डॉ. नारळीकरांची एक कथा, जोडप्याला मुलगाच व्हावा यासाठी औषध तयार केलेल्या एका शास्त्रज्ञाची आहे. त्यामुळे करमणुकी खेरीज समाजप्रबोधनही होणं अपेक्षित आहे. मगाशी उल्लेख केलेल्या Twenty Thousand Leagues Under The Sea या पुस्तकावरून अनेक कल्पना उचलून अधुनिक पाणबुडी तयार केली गेली. अशी प्रेरणाही उद्याच्या शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांना विज्ञानकथेमुळे मिळू शकेल.

समारोप

श्रोतेहो, तुम्हाला देखील पुरण असलेली पुरणपोळी बनवता येईल. म्हणजेच विज्ञान असलेली विज्ञानकथा लिहिता येईल. प्रयत्न करून पहा.

अशा एका विश्वाची कल्पना करा जिथे ध्वनीचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे. या विश्वात माणूस जर गेला तर काय होईल याची कल्पना करू शकता का तुम्ही ? उदाहरणार्थ, डोळ्यांपेक्षा कान अधिक संवेदनाक्षम होण्याची गरज भासेल. डाव्या आणि उजव्या कानांमुळे दोन वेगवेगळ्या गोष्टींची संवेदना होईल. फटाक्याचा आवाज आधी येईल आणि नंतर तो फुटताना दिसेल. अशा कल्पना करा आणि ते सारं लिहून काढा. त्यात तुमचे मित्र मैत्रिणी कसे वागतील त्याचं वर्णन करा की झाली तुमची विज्ञानकथा तयार !

किंवा चंद्रावरचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या तुलनेत १७ टक्केच आहे हे तुम्हाला माहिती आहे. तिथे जर दोरीवरच्या उड्यांच्या स्पर्धा घेतल्या तर काय घडेल याची तुम्ही कल्पना करू शकता.
किंवा अशी कल्पना करा की झाडाच्या पानांत असणाऱ्या पेशींत mp3 पद्धतीनं गाणं साठवता येतं. आता ही झाडं कशी गातील ? शेक्सपियरच्या as you like it या नाटकात forest of orden आहे. असं सुंदर जंगल की ज्यात काव्य आहे. तुमच्या विज्ञान कथेला खुद्द शेक्सपियरनीच सुरुवात करून दिली की…
किंवा अशी कल्पना करा की माणसाला न बोलता आपले विचार प्रक्षेपित करता येतात. मग कोण हे विचार ऐकतील, कोण कसे वागेल …
किंवा अशी कल्पना करा की माणसापेक्षा जास्त वैज्ञानिक प्रगती झुरळांनी केली आहे. आता माणसांवर कोणते फवारे मारले जातील …
किंवा अशी कल्पना करा की दुसऱ्याच विश्वातली तुमच्या सारखीच दिसणारी वागणारी एक व्यक्ती तुम्हाला भेटते. आता खरे तुम्ही कोण आहात…

तेव्हा एक विज्ञानकथा लिहूनच टाका बरं…. नमस्कार.

This entry was posted in विज्ञान तंत्रज्ञान. Bookmark the permalink.