गेल्या ५० वर्षांपासुन मानवी हालचालींमधे (खरे तर उपदव्यापांमधे) वाढ झाली आहे. विशेषतः जीवाश्म इंधनाच्या(Fossile Fuel) ज्वलनामधे प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे कार्बन डायआॅक्साइड(CO2) व इतर हरितगृह वायु(Green House Gases) हवेत साेडले जातात. म्हणून जास्त उष्णता वातावरणात धरून ठेवली जाते आणि जागतिक हवामानावर परिणाम हाेताे. जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राच्या पातळीमधे वाढ हाेत आहे आणि पर्जन्यमान बदलत आहे.
हवामान बदलामुळे सामाजिक आणि पर्यावरणीय आराेग्य ठरवणाऱ्या गाेष्टींवर परिणाम झाला आहे. उदा. स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, मुबलक पाैष्टिक अन्न आणि सुरक्षित निवारा. जगभरात असे दिसुन आले आहे की माेठ्याप्रमाणावर हाेणाऱ्या हवामानबदलामुळे मानवाच्या आराेग्यावर नकारात्मक परिणाम हाेतात. भारतात सुध्दा तापमानवाढीचे परिणाम दिसून आले आहेत. १६ मे २०१६ मधे फलाेदि(राजस्थान) गावचे तापमान ५१0C हाेते. तसेच तेथील लाेकांमधे उष्णतेमुळे उष्माघात, किडनीचे आजार, शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी हाेणे अशी लक्षणे मुख्यत्वेकरुन तरुण आणि वृध्दांमधे दिसुन आली.
दिवसेंदिवस वायु प्रदुषणाच्या पातळीत वाढ हाेत आहे. प्रदुषित हवा श्वासावाटे शरिरात गेल्याने बरेच जण श्वसनसंस्थेच्या आजारांनी ग्रासलेले आहेत. जगातली 90% लोकसंख्या अशा ठिकाणी राहते जिथे हवेच्या प्रदूषणाची पातळी त्याच्या मार्गदर्शक तत्त्वाच्या पातळीपेक्षा जास्त आहे, विशेषतः गरीब देशांमध्ये. 2019 च्या वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टनुसार वायू प्रदूषणाचं प्रमाण जास्त असणारी सर्वाधिक शहरं भारतात आहेत. मानवा मुळे हाेणाऱ्या प्रदूषणाने (उदा. वहानांमुळे हाेणारे प्रदूषण, कारखान्यांमुळे व काेळसा जाळल्याने हाेणारे प्रदूषण) तापमानात वाढ हाेत आहे. तसेच हवेतील आेझाेनचे आणि इतर प्रदूषकांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ह्रदय विकार आणि श्वसनसंस्थेच्या आजारां मधे वाढ झाली आहे.
हवामानाच्या स्थितीचा परिणाम पाण्यापासुन पसरणाऱ्या आणि कीटक किंवा थंड रक्ताच्या प्राण्यांमार्फत पसरणाऱ्या राेगांवर हाेताे. एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की मलेरिया आणि डेंग्यू सारख्या आजारांचे पसरण्याचे प्रमाण आता वाढत आहे. भारतामध्ये ९६ टक्के लाेकांना मलेरियापासून धाेका आहे. राेग वाहक जंतूंच्या वाढीचा वेग हवामान बदलावर अवलंबून असताे. उदा. तापमान जेव्हा ठराविक पातळी पर्यंत वाढते तेव्हा डासांच्या पुनरुत्पादनामधे आणि वाढीमधे वाढ हाेते.
सततच्या बदलत्या पर्जन्यमानामुळे ताज्या व स्वच्छ पाण्याच्या पुरवठ्यावर वाईट परिणाम झाला आहे. स्वच्छ पाण्याच्या कमतरतेमुळे पाेटाच्या विकारांमधे वाढ झाली आहे. त्यामुळे वर्षाला ५ वर्षांखालील सुमारे ५ लाख मुले मरण पावतात.
मानवाचा हावरटपणा आणि चुकीच्या पध्दतीने केलेला “विकास” ह्या गाेष्टींमुळे हवामान बदलात ही वाढ झाली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे मानवास वेगवेगळ्या आजारांनी (उदा. श्वसनसंस्थेचे आजार, ह्रदय विकार) वेढलेले आहे. त्यामुळे कराेना सारख्या आजाराला माणूस पटकन बळी पडत आहे. हे सगळे थांबवायचे असेल तर जागतिकीकरण कमी करुन स्थानिकीकरणावर भर द्यायला हवा. तसेच चुकीच्या पध्दतीने चाललेला “विकास” वेळीच थांबवला नाही तर आपण काेणत्याही राेगाला समर्थपणे ताेंड देऊ शकणार नाही.
या लेखासाठीचे संदर्भ :
https://www.bbc.com/marathi/international-52366620
https://www.who.int/news-room/fact-sheets/detail/climate-change-and-health
https://climate.org/climate-change-and-the-public-health-dilemma-in-india/