काय सांगताय काय …

साडेतीनशे वर्षांपूर्वी..

विज्ञानाने काही कमी टक्के टोणपे खाल्लेले नाहीत. अनेक गैरसमज आणि हास्यास्पद कृती यांच्यावर मात करून विज्ञान आजपर्यंत पोहोचले. त्या वाटचालीतले काही टप्पे असे आहेत…

औषध निर्माण

१६३१ साली जर्मन शास्त्रज्ञ प्रा. जोहानस हार्टमान यांचा मृत्यू झाला. ते केमिस्ट्री (Chymiatrie कायमियॅट्री) या विषयाचे प्राध्यापक-संशोधक होते. त्यांचा खास विषय होता औषध निर्माणाचे विज्ञान. मानवी मेंदूचा अर्क काढून त्याचा काढा पिणे हा फीट या विकारावरचा उपाय आहे असे त्यांचे मत होते. त्या शिवाय हिरव्या बेडकाच्या यकृतापासून तयार केलेली पूड वापरूनही हा विकार बरा होऊ शकतो असे त्यांनी मांडले होते. हे बेडूक मे ते जुलै या महिन्यातच जर्मनीत सापडत असत.

पृथ्वी स्थिर का आहे ?

सिपियो कियारामॉंटी या प्राध्यापकांनी तर तीनशे वर्षांपूर्वी केलेले विधान आज केवळ हास्यास्पद वाटेल असे आहे. पृथ्वीला ना कोणते अवयव आहेत ना स्नायू मग ती हलेलच कशी, ती स्थिरच असली पाहिजे असे त्यांनी १६३३ साली म्हटले. हे प्राध्यापक इटली देशातील सुप्रसिद्ध पिसा विद्यापीठातील विज्ञान-प्राध्यापक होते.

राजे का हसले ?

बॉइलचा नियम दाखवणारा आलेख

१६६४ साली इंग्लंडचे राजे चार्ल्स द्वितीय हे राज्य करीत होते. त्याच सुमाराला रॉबर्ट बॉइल हा संशोधक हवेचे वस्तुमान व आकारमान यावर प्रयोग करीत होता. बॉइल सारख्या संशोधकाने असे हवेचे वजन करण्यात वेळ घालवावा ही गोष्ट राजेसाहेबांना अजिबात रुचली नव्हती. वेळेच्या या दुरुपयोगाबद्दल त्यांनी मोठ्याने हसून नापसंती व्यक्त केली अशी नोंद सॅम्युअल पेपी यांनी त्यांच्या डायरीत केली आहे. हवेवरील दाब वाढला की त्याचे आकारमान कमी होते आणि दाब कमी झाला की त्याचे आकारमान वाढते हे सांगणारा नियम व त्यामागील गणित रॉबर्ट बॉइल यांनी शोधून काढले. हा नियम बॉइल्स लॉ म्हणून प्रसिद्ध आहे.

 

This entry was posted in विनोद. Bookmark the permalink.