डॉ.अपर्णा वाटवे या गेली काही वर्षे पर्यावरण या क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांचा सध्याचा प्रकल्प कोकणवासियांच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. त्या प्रकल्पाबद्दल त्यांच्याच शब्दात वाचा….
भारतातील दक्खनचे पठार हे लावापासून तयार झालेल्या काळ्या बसाल्टचे बनले आहे. काही ठिकाणी बसाल्टचे रुपांतर “जांभा” नावाच्या लाल दगडात झालेले आढळते. यांनाच सडे म्हणतात. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जांभ्याचे विस्तीर्ण सडे आहेत. कोकणची प्रसिद्ध तांबडी माती हि या सडयाचीच देन. घाटमाथ्यावरही लाखो वर्षांपुर्वी असेच मोठे सडे होते. पण भूभागाची झीज झाल्याने ते काही ठिकाणीच दिसतात. पर्यटकांचे आवडते पांचगणी tableland, कास हे सडेच आहेत. जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून २०१२ साली UNESCO ने कासची निवड केली. कोकणचे सडे मात्र उपेक्षित राहिले.
सड्यावर मातीचा थर तसा कमी त्यामुळे त्यावर झाडोरा थोडाच असतो. वर्षाचे ८ महिने कोरडे असलेले सडे पावसाळ्यात पाण्याने थबथबतात. यामुळे शुष्क आणि पाणथळ अशा दोन्ही जागी वाढणारी झाडे पठारांवर दिसतात. सड्यावरील हवामान बदलांशी इथल्या वनस्पती आणि प्राणी या जुळवून घेतात.
जांभा दगडात पाणी शोषून घेण्याचे गुणधर्म आहेत. म्हणूनच सड्यावरील बावी/विहिरी झरे यांना बारमाही पाणी असते. वरून रुक्ष खडखडीत आणि आतून ओलावा असलेला सडा म्हणजे जणू कोकणचे प्रतिक. नुकतीच कोकणातील सड्यांवर अनेक ठिकाणी कातळशिल्पे सापडली. यावरून कोकणात निदान काही हजार वर्षे तरी मानवी अस्तित्व आहे हे निश्चित झाले. अनेक जुनी देवस्थाने, समाध्या, ठाणी ही सड्यावर आढळतात. कोकणचा इतिहास जणू सड्यांवर पाहायला मिळतो.
पावसाळ्यात सड्यावर शेवाळ, लीचेन, छोट्या वनस्पती आणि गवते वाढतात. यामध्ये Utricularia, Drosera सारख्या कीटकभक्षी वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात. दगडांवरही काही अमरी (Orchids) वाढतात. पठारावरील मातीत पुरेशी खनिजे नसली तरीही या वनस्पती कीटक खाऊन आपली गरज भागवतात. पठारावरील पावसाळी डबक्यातून अनेक प्रदेशनिष्ठ– endemic वनस्पती आढळतात. Corynandra elegans ही त्यापैकीच एक. हि प्रजाती फक्त रत्नागिरी जिल्ह्यातील सड्यावरच आढळते. कंदीलपुष्प म्हणजेच सिरोपेजीयाच्या काही प्रदेशनिष्ठ प्रजातीही पठारावर दिसतात. सिरोपेजीया अटेनुआटा हि प्रजाती गावखडी सड्यावर दिसते.
पठारावरील वनस्पतींचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची फुले. पावसाळ्याच्या शेवटी पठारावर लाखो पिवळी, गुलाबी, निळी, पांढरी, व जांभळी फुले फुलतात. हा रंगोत्सव खरेतर असतो परागीभवन करणा–या किटकांसाठी. त–हत–हेच्या माशा, मधमाशा, भुंगे, फुलपाखरे या फुलांना भेट देतात आणि बीज निर्मितीला मदत करतात. जांभ्याचा दगड पावसाचे पाणी धरून ठेवतो आणि तेच पाणी जिवंत झ–याच्या रूपाने पठाराच्या कडेने पाझरते. याने आजूबाजूच्या गावातील लोकांसाठी, गुरांसाठी वर्षभर पाण्याची सोय होते. वनस्पतींप्रमाणेच काही वैशिष्ट्यपूर्ण प्राणीही पठारावर आढळतात. पावसाळी डबक्यात गोड्या पाण्यातील श्रीम्प्स सापडतात. Hemidactylus जातीच्या दुर्मिळ पालीही इथे सापडतात. त्यापैकी एक डोरले गावाजवळ सापडली म्हणून तिचे नावच “डोरले गेको”. खडकाखाली पाली, विंचू, बेडूक आणि कित्येक प्राण्यांना राहायला आणि अंडी घालायला सुरक्षित जागा मिळते. तो जांभा खडकाच्या भोकातून अंडी घालतो. याखेरीज बेडूक, सिसिलीअन ही पाय नसलेली बेडकाची जात, फुरसे आणि इतर साप, काही मासेही सड्यावर राहतात.
बराच काळ सडे ही पडजमीन, वैराण जागा आहेत असाच समज बहुतेक लोकांचा होता. सरकारी नकाशात आजही सड्यांची नोंद ‘wasteland’ म्हणजे पडीक, नापीक जमीन अशीच आहे. त्यामुळे त्यावर अनेक विनाशकारी प्रकल्प झाले आहेत किंवा होऊ घातले आहेत. कोकणात पठाराचा वापर औद्योगिक वसाहती बांधण्यासाठी केला गेला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जांभ्याच्या सडयाखाली मिळणाऱ्या अलुमिनिय्म, लोह खनिजासाठी मोठ्या प्रमाणात खाणी चालू झाल्या. कोकणात चिऱ्यांच्या खाणीपायी अनेक सडे नष्ट झाले. असा व्यावसायिक वापर करताना लाखमोलाच्या जैवविविधतेचे नुकसान होत आहे याची जाणीव कुणालाही नाही.
२०१२ मध्ये बायोम कॉन्सेर्वेशन फाउंडेशन संस्थेने पुढाकार घेऊन सडे संवर्धन आणि संरक्षण मोहीम चालू केली. सह्याद्री, कोकण परिसरात काम करणारे संशोधक आणि संस्था या जोडले गेले. संवर्धन कामात एकमेकांना मदत करू लागले. यातून कोल्हापूरच्या सड्यावरील खाणींना विरोध करणे शक्य झाले. वनखात्यानेही सर्वतोपरी साथ दिली. सातारा जिल्ह्यातील सर्व सडे आज महाराष्ट्र शासनाने संरक्षित केले आहेत.
कोकण सड्यांना असे संरक्षण मिळावे यासाठी स्थानिक जनतेची मदत गरजेची आहे. त्याचबरोबर सरकारची, प्रशासनाची मदतही लागते. महाराष्ट्र जैवविविधता मंडळ यासाठी प्रयत्न करू शकते. कोकणातील बहुसंख्य सडे महसूल खात्याच्या नियंत्रणाखाली आहेत. त्यावरील विकास हा निसर्गपूरक असावा यासाठी ग्राम पंचायतीने जागरूकता दाखविली पाहिजे. सडे वाचले तर पाणी वाचेल आणि पाणी वाचले तरच त्यावर फळबागा, सुपारीबागा, काजू, नागवेली बहरतील. गावाचा इतिहास, गावाची ओळख असलेले हे सडे निसर्ग पर्यटनाचे केंद्र ठरू शकतील. महाराष्ट्रातील सडे हा एक अमुल्य जागतिक वारसा आहे. त्यांच्या कायम स्वरूपी संरक्षणासाठी आपण प्रयत्न केले तरच पुढच्या पिढीला हे निसर्गसुंदर सडे पहाता येतील.
यासाठी खाली गोष्टी करता येतील
१. गावच्या सड्यांची माहिती गोळा करावी
२. त्यावरील वनस्पती प्राणी, पाण्याचे स्त्रोत, झरे, विहिरी , देवस्थाने, कातळशिल्पे यांची नोंद करावी
३. स्थानिक नकाशे तयार करावेत
४. ग्रामसभेच्या संमतीने सड्यांच्या संरक्षण आणि व्यवस्थापनाचा आराखडा तयार करावा
५. हा आराखडा सरकारला सदर करावा.
या कामासाठी मदत करण्यासाठी आमचा पत्ता
Sada: A Rock Outcrop Network Initiative
c/o Biome Conservation Foundation, 34/6, Gulawani Maharaj Road, Pune 411004.