अवघड नाव
एकदा एक रसायनशास्त्रज्ञ औषधांच्या दुकानात जातो आणि ‘ऍसेटिलसॅलिसिलिक ऍसिड’ मागतो.
दुकानदार विचारतो, “तुम्हांला ऍस्पिरीन हवंय का?”
रसायनशास्त्रज्ञ म्हणतो “हो ना, ते अवघड नाव लक्षातच राहत नाही…”
हलका हेलियम
मी ‘हेलियम’वरचे पुस्तक वाचत होतो. खाली ठेवताच येईना…
गणित
एक जीवशास्त्रज्ञ, एक अभियंता नि एक गणितज्ञ एका रिकाम्या इमारतीसमोर उभे होते.
दोन माणसे आत गेली. काही वेळाने तीन माणसे बाहेर आली.
जीवशास्त्रज्ञ म्हणाला, “जैविक पुनरुत्पादन”.
अभियंता म्हणाला, “आपण मोजायला चुकलो”.
गणितज्ञ म्हणाला, “आता या इमारतीत एक माणूस गेला तर ती पूर्ण रिकामी होईल”.
सरासरी
एक संख्याशास्त्रज्ञ नदी ओलांडताना बुडून मरण पावला.
बिचारा. नदीची खोली सरासरी चार फूट होती यावर विसंबला…
नाही तर ….
विज्ञानाचे शिक्षक वर्गात बोलत होते. “ऑक्सिजनशिवाय आपण जगू शकत नाही. ऑक्सिजनचा शोध १७७१ साली लागला”.
बंडू खूश होऊन म्हणाला, “बरं झालं आपण १७७१ नंतर जन्माला आलो. नाहीतर मेलोच असतो”.
कशासाठी..
गोमेला शंभर पाय का असतात?
चालण्यासाठी.
म्हणून…
बाई, बाई, मला हे गणित सोडवता येत नाही.
अरे, हे तर पाच वर्षांचा मुलगाही सोडवेल.
अच्छा, कळलं. मी दहा वर्षांचा आहे म्हणून…
शक्यता
एक संख्याशास्त्रज्ञ आणि एक मानसशास्त्रज्ञ गाडीतून चालले होते. संख्याशास्त्रज्ञ गाडी चालवत होता.
प्रत्येक चौकात संख्याशास्त्रज्ञ गाडीचा वेग अचानक खूप वाढवे आणि चौक ओलांडल्यावर कमी करी.
असे चारपाच वेळा झाल्यावर मानसशास्त्रज्ञ म्हणाला, “ही स्वनाशाची प्रेरणा तुझ्यात कशी आली याचा जरा अभ्यास करायला हवा”.
“छे रे”, संख्याशास्त्रज्ञ म्हणाला.
“त्याचे काय आहे, चौकात अपघाताची शक्यता खूप जास्त असते. अशी धोक्याची ठिकाणे पटकन ओलांडावी म्हणून मी वेग वाढवतो. ”
बिनचूक उत्तराचे कारण
अनेक विषयातले तज्ञ एका ठिकाणी जमले होते.
त्यांना प्रश्न विचारण्यात आला, “दोन गुणिले दोन किती? ”
अभियंत्याने कॅलक्युलेटर काढला, त्यावर बरीच आकडेमोड केली आणि म्हणाला, “साधारण ३.९९९”.
भौतिकशास्त्रज्ञाने बरेच संदर्भग्रंथ शोधले, लॉग टेबल्स वापरली आणि म्हणाला, “साधारण ३.९८७ आणि ४.०२३ च्या मध्ये कुठेतरी”
संगणकशास्त्रज्ञ म्हणाला, “मी प्रोग्रॅम लिहून पटकन उत्तर काढीन. पण किती दशांशांपर्यंत उत्तर पाहिजे आहे? ”
गणितज्ञाने बराच विचार केला नि म्हणाला, “मला उत्तर माहीत नाही, पण हे सांगतो की या प्रश्नाचे उत्तर अस्तित्वात आहे”.
तत्त्वज्ञ म्हणाला, “दोन गुणिले दोन याचा नीट विचार करायला हवा. दोन्ही दोन सारखेच आहेत की वेगवेगळे? मानवी जीवनात गुणाकाराला काय अर्थ असतो? प्राण्यांच्या जीवनातही तोच अर्थ असेल का? ”
डॉक्टर ओरडला, “चार”.
सगळे आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले.
“तुला काय माहीत? ”
“मी पाठ केलंय”.
लांबी आणि उंची
एक अभियंत्यांचा चमू एका उंच ध्वजस्तंभाची उंची मोजायची खटपट करीत होता. पण मोजण्याची टेप सारखी सटकत होती.
तेवढ्यात तिथे एक गणितज्ञ आला. त्याने तो ध्वजस्तंभ उपसून बाहेर काढला नि आडवा केला. आता मोजणे अगदी सोपे झाले.
एक अभियंता वैतागून म्हणाला, “हे गणितज्ञ असलेच. उंची मोजायची होती तर याने लांबी मोजली”.
मला माहिताय्
एकदा एका गणितज्ञाने आणि अभियंत्याने एका प्रयोगात भाग घेतात.
गणितज्ञ पहिल्यांदा आत गेला. त्याला सांगण्यात आले की तो खोलीच्या एका टोकाला एका खुर्चीत बसेल आणि खोलीच्या दुसऱ्या टोकाला एका स्टुलावर त्याच्या अत्यंत आवडीचा खाद्यपदार्थ ठेवला जाईल. दर पंधरा सेकंदाला त्याची खुर्ची त्या खाद्यपदार्थाच्या दिशेने त्याच्या आणि खाद्यपदार्थाच्यामध्ये असलेल्या अंतराच्या निम्मे अंतर सरकवली जाईल.
“श्या! “, गणितज्ञ वैतागून म्हणाला, “मला काय मूर्ख समजता? ” आणि तरातरा निघून गेला.
अभियंता आत गेला. प्रयोगाची माहिती ऐकल्यावर स्टुलावरच्या गुलाबजामकडे प्रेमाने बघत तो पटकन खुर्चीत बसला.
“तू त्या गुलाबजामपर्यंत कधीच पोहोचू शकणार नाहीस हे तुला माहीत आहे का? ” प्रयोग करणाऱ्याने विचारले.
“हो. आणि मला हेही माहीत आहे की मला जितक्या जवळ जायची गरज आहे तितक्या जवळ मी काही मिनिटांतच पोहोचेन”.