भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका

दैनंदिन व्यवहारात आपण कॅलेंडरचा वापर करत असतोच. ते ग्रेगरियन कॅलेंडर म्हणून ओळखले जाते. येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून कालगणना सुरू करणारे हे कॅलेंडर आहे. पण भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका अस्तित्वात आहे हेच अनेकांना ठाऊक नाही. तिची ही ओळख…

१९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका निर्मितीची प्रक्रिया चालू झाली.  त्यानंतर या राष्ट्रीय दिनदर्शिकेची सुरुवात अधिकृतपणे १ चैत्र,शके १८७९ रोजी म्हणजे २२ मार्च, १९५७पासून झाली.

डॉ. मेघनाद साहा या ज्येष्ठ भारतीय वैज्ञानिकाच्या नेतृत्वाखालील समितीने ही विज्ञानाधिष्ठित दिनदर्शिका तयार केली. ही दिनदर्शिका सौर पद्धतीची आहे याचा अर्थ चंद्राच्या उगवण्या-मावळण्याचा विचार यात केलेला नाही. (हिंदू पंचांग चांद्र आहे. त्यामुळे तिथीमधील क्षय किंवा वाढ या गोष्टी त्यात अंतर्भूत आहेत.) लोकांचा दैनंदिन व्यवहार सूर्याच्या उगवण्या मावळण्याशी संबंधित असतो. त्यामुळे ही राष्ट्रीय दिनदर्शिका अधिक व्यावहारिक आहे असे म्हणावे लागेल.

भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका ही भारत सरकार पुरस्कृत भारताची अधिकृत राष्ट्रीय दिनदर्शिका आहे. भारतीय राजपत्र, भारतीय आकाशवाणीने प्रसारित केलेल्या बातम्या, भारतीय संसदेच्या कामकाजात हिचा वापर केला जातो. भारताबरोबरच जावा व बाली येथील इंडोनेशियन हिंदू हिचा वापर करतात. नेपाळमधील नेपाळ संवत या दिनदर्शिकेची निर्मिती भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेपासूनच झाली. नियमानुसार भारतातील बँकांच्या सर्व व्यवहारांत या दिनांकाचा वापर करण्यास परवानगी आहे.

चैत्र-वैशाख आदी नावे या राष्ट्रीय दिनदर्शिकेत कायम ठेवण्यात आली आहेत. वर्षाचा क्रमांक हिंदू पंचांगातील शालिवाहन शकाचाच ठेवला आहे, या गोष्टी वगळता या दिनदर्शिकेचे हिंदू पंचांगाशी काही साधर्म्य नाही.

तक्त्यात पाहिल्यावर असे लक्षात येईल की या दिनदर्शिकेची सुरुवात (चैत्र १) संपातबिंदूपासून होते. या वेळी दिवस व रात्र साधारणपणे सारख्या कालावधीची असते. या दिनदर्शिकेनुसार वर्षाचा मध्यही (अश्विन १) रात्र-दिवसाच्या कालावधीचा समतोल (संपातबिंदू) साधतो.

महिना महिन्याचे दिवस आरंभाची तारीख

चैत्र ३०/३१ २२ मार्च/२१ मार्च

वैशाख ३१ २१ एप्रिल

ज्येष्ठ ३१ २२ मे

आषाढ ३१ २२ जून

श्रावण ३१ २३ जुलै

भाद्रपद ३१ २३ आॅगस्ट

आश्विन ३० २३ सप्टेंबर

कार्तिक ३० २३ आॅक्टोबर

अग्रहायण ३० २२ नोव्हेंबर

१०

पौष ३० २२ डिसेंबर

११

माघ ३० २१ जानेवारी

१२

फाल्गुन ३० २० फेब्रुवारी

शालिवाहन शकाच्या आकड्यामध्ये ७८ मिळवले की इसवी सनाचा आकडा येतो. इसवी सनाप्रमाणे लीप इयर असेल भारताच्या या राष्ट्रीय दिनदर्शिकेत चैत्र माहिन्याचे ३१ दिवस असतात (अन्यथा ३०), आणि चैत्र महिन्याची सुरुवात २१ मार्चला (अन्यथा २२ मार्चला) होते. क्रांतिवृत्तात सूर्याची गती हळू असल्याने, वर्षातले पहिले सहा महिने ३१ दिवसांचे असतात, तर इतर महिने प्रत्येकी ३० दिवसांचे असतात.

गतिमान संतुलन चा   या महिन्याचा इ-अंक संपादक श्री. दिलीप कुलकर्णी यांची परवानगी नुसार आमच्या संकेतस्थळावरून तुम्ही डाउनलोड करू शकता. हा अंक भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिके प्रमाणे महिन्याच्या पहिल्या दिवशी प्रकाशित केला जातो. या अंकात या महिन्याची राष्ट्रीय दिनदर्शिका छापली आहे.

 

This entry was posted in जीवन भाषा. Bookmark the permalink.