मॅक्बेथ

शेक्सपियर हा इंग्रजी भाषेतला एक अतिशय महान लेखक मानला जातो. मराठी वाचकांना त्याच्या लेखनाबद्दल कुतुहल आणि थोडीशी भीती आहे. भीती आहे ती त्याच्या जुन्या भाषेमुळे. म्हणूनच त्याच्या मॅक्बेथ या शोकात्म नाटकाचं कथानक मी इथे मराठीत देत आहे. त्यामुळे कुतुहल थोडेसे शमेल आणि भीतीचा प्रश्न उरणार नाही.

मात्र शेक्सपियरच्या भाषेचा डौल अनुभवायला मात्र हे मराठी कथानक उपयोगी पडणार नाही. त्याची पात्रं मधूनच काव्यात्म बोलतात. त्यात यमकही असते. त्याला चेटकिणीही अपवाद असत नाहीत.

उदा. लढाईवरून विजयी होऊन परत येणाऱ्या मॅक्बेथची चाहूल लागते तेव्हा एक चेटकीण असं म्हणतेः

A drum, a drum
Macbeth doth come

ताकदवान स्वगतं हा तर शेक्सपियरच्या भाषेचा सुंदर दागिना आहे. मॅक्बेथने त्याचा एके काळचा सहकारी मॅक्डफच्या पत्नी आणि मुलांची हत्या करवली आहे. ही बातमी कळल्यावर मॅक्डफ म्हणतोः

Macduff: But I must also feele it as a man;
I cannot but remember such things were
That were most precious to me: Did heauen looke on,
And would not take their part? Sinfull Macduff,
They were all strooke for thee: Naught that I am,
Not for their owne demerits, but for mine
Fell slaughter on their soules: Heauen rest them now

Malcom: Be this the Whetstone of your sword, let griefe
Conuert to anger: blunt not the heart, enrage it

मॅक्डफः हो पण माणूस म्हणूनही मला त्याची जाणीव व्हायला हवी. ज्या गोष्टी मला सर्वात जास्त प्रिय-मूल्यवान होत्या, त्याच अशा नष्ट केल्या गेल्या ? स्वर्गातल्या देवाचं लक्ष तिकडे नव्हतं काय ? हे पापी मॅक्डफ, तुझ्या प्रिय पत्नी आणि बाळांची हत्या हे तुझ्याच पापाचं फळ आहे. त्यां निष्पापांच्या कर्मांचं नाही बरं ! हं….त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.

माल्कमः ही घटना तुझ्या तलवारीला धार लावणारा दगड ठरू दे. तुझे दुःख क्रोधाग्नीत बदलू दे. तुझे ह्रदय या घटनेने बोथट न बनता धारदार बनू दे.

ठसठशीत पात्रांचे स्पष्ट स्वभावदर्शन हे शेक्सपियरच्या नाटकांचं एक वैशिष्ट्य आहे. पण प्रत्येक पात्र एक तर काळे कुट्ट किंवा गोरे पान करायचं असं मात्र नाही. या नाटकाचा नायक मॅक्बेथ हा खरं तर दयाळू आणि पापभीरु आहे. पण त्याने लेडी मॅक्बेथच्या (ही आनंदीबाई पेशव्यांची आठवण करून देते) सत्ता आणि संपत्तीच्या हव्यासापुढे हात टेकले आहेत. एकदा सत्तेचा मोह पडला की मग विवेक नष्ट होतो हे आजपर्यंत पहायला मिळणारे सत्य नाटककाराने दोन शतकांपूर्वीच मांडले आहे.

चेटकिणी आणि जादूटोण्यावर असणारा विश्वास हाही आजतागायत चालूच आहे. निवडणुकीच्या आधी मतपेट्या किंवा मतदानयंत्राची पूजा करणारे आणि यज्ञयाग करणारे आपल्याकडे आहेतच. म्हणून चेटकिणींची भाकिते हा या नाटकातला भाग आजच्या वाचकाला खटकू नये.

शेक्सपियरच्या नाटकांचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे सतत घडणाऱ्या नाट्यमय घटना. कथानकाच्या मराठी रूपांतरात वाचकांना त्याचा प्रत्यय येईल. दुधाची तहान ताकावर भागवणारा हा प्रयत्न असला तरी काही प्रमाणात वाचकांचं कुतुहल त्यामुळे शमेल अशी आशा आहे.

गुटेनबर्ग या संकेतस्थळावर तुम्हाला मूळ मॅक्बेथ नाटक इथे वाचता येईल.

मॅक्बेथ नाटकाचे  कथानक मराठीतून  इथे डाउलोड करता येईल. (डाउनलोड करण्यासाठी लिंकवर राइट क्लिक करा आणि Save Link As हा पर्याय निवडा.)


तुम्हाला हा लेख आवडल्यास इतरांना कळवण्यासाठी खालील E mail या बटणावर क्लिक करा.

This entry was posted in जीवन भाषा. Bookmark the permalink.