वेडा

लेबाननमधे जन्मलेले अमेरिकन कवि-लेखक खलिल जिब्रान (६ जानेवारी १८८३ ते १० एप्रिल १९३१) यांच्या Madman या पुस्तकातल्या काही लेखनाचं हे मराठी भाषांतर.

प्रचंड खप असलेल्या कविता-पुस्तकांच्यात शेक्सपियर आणि लाओझी यानंतर जिब्रानचाच नंबर लागतो.  पण त्याच्या लिखाणाला कविता म्हणणंही योग्य होणार नाही. अतिशय तरल भावना व्यक्त करताना कमितकमी शब्द वापरणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. इसापच्या गोष्टी अशाच छोट्या आणि बोधप्रद आहेत. पण त्या काहीशा बाळबोधही वाटतात. जिब्रानचं लेखन अधिक खोलवर जाणारं आणि काहीसं गूढ आहे. ते वाचकाला विचार करायला लावतं. त्यातलं सौंदर्य शोधणं हे येरागबाळाचं काम नाही. जिब्रानची ताकद अल्पाक्षरी असण्यात आहे पण त्यामुळे त्याचे शब्द बोजड होत नाहीत.

हा लेख लिहिण्यामागचा हेतु वाचकांना जिब्रानचं मूळ पुस्तक “Madman” वाचायला प्रवृत्त करणं हा आहे. त्याच्या काही अल्पाक्षरी काव्यकथा भाषांतरित करून पुढे देत आहे.

बुजगावणं

एकदा मी बुजगावण्याला म्हणालो, ” तू इथे शेतात एकट्यानंच उभं राहिल्यानं कंटाळून, थकून जात असशील नाही का ?”
बुजगावणं म्हणालं, ” इतरांना घाबरवण्यात- त्रास देण्यात एक सखोल, चिरकाल टिकणारा आनंद असतो. त्यामुळे मला कधीच कंटाळा येत नाही. ”
मी एक मिनिटभर विचार केला आणि म्हटलं, ” खरं आहे तुझं म्हणणं.  कारण असं घाबरवण्यातला आनंद मी अनुभवलाय् ”
तसा तो म्हणाला, ” ज्यांच्यात गवत आणि भुस्सा भरलेला असतो त्यांनाच हा आनंद कळतो, अनुभवता येतो.   ”
मग मी पुढे निघून गेलो. कारण तो माझी स्तुती करतोय का निंदा हे मला कळलं नाही.

पुढे एक वर्षाभरात ते बुजगावणं तत्वज्ञ बनलं. मी पुन्हा एकदा त्या शेताजवळून जाताना पाहिलं तेव्हा दोन कावळे त्याच्या हॅटखाली घरटं करताना आढळले.

कोल्हा

सूर्योदयाच्या वेळी कोल्ह्यानं आपल्या सावली कडे पाहिलं तेव्हा तो म्हणाला ” आज दुपारच्या जेवणासाठी एखादा उंटच खावा म्हणतो ! “.  पूर्ण सकाळ त्यानं उंट शोधण्यात घालवली. मग मात्र भर दुपारी स्वतःच्या सावलीकडे पाहून तो म्हणाला, ” एखादा उंदीर मिळाला तरी चालेल.”

नवं सुख

काल रात्री मी एका नव्या सुखाची निर्मिती केली. त्या सुखाचा अनुभव घेऊन त्याची पारख करत असतानाच, एक देवदूत आणि सैतान माझ्या घरापाशी धावतच आले. घराच्या दाराशीच त्यांची भेट झाली.
माझ्या नवनिर्मित सुखावरून त्यांच्यात भांडण झालं. एक म्हणाला ” अरे हे तर पाप आहे. ” दुसरा म्हणाला, ” नाही हे  पुण्यच आहे.”

दोन पिंजरे

माझ्या वडिलांच्या बागेत दोन पिंजरे आहेत. एकात, माझ्या वडिलांच्या गुलामांनी निनावाहच्या वाळवंटातून आणलेला सिंह आहे. दुसऱ्या पिंजऱ्यात गाणं न म्हणणारा बोलका पक्षी आहे.
दररोज पहाटे, पक्षी सिंहाला उद्देशून म्हणतो, ” तुरुंग-बंधो,  सुप्रभात ! “

डोळा

एक दिवस डोळा म्हणाला, ” या दऱ्याखोऱ्यांच्या पलीकडे एक निळ्या धुक्यानं वेढलेला डोंगर आहे. किती सुंदर आहे ना तो ?”
कानानं हे नीटपणे ऐकलं आणि तो म्हणाला, “पण कुठे आहे हा डोंगर,  मला ऐकू येत नाहीये अजिबात त्याचा आवाज.”
मग हात म्हणाला, ” मी प्रयत्न करतोय, पण डोंगर काही मला जाणवत नाहीये, किंवा स्पर्शही करता येत नाहीये त्याला.”
नाक म्हणालं, ” डोंगर वगैरे काही नाहीये, मला मुळीच वास येत नाहीये डोंगराचा.  ”
डोळ्यानं मग दुसरीकडे पहायला सुरुवात केली.
……..तेव्हा इतरांचं एकमत झालं, ” काहीतरी बिघडलंय बरका या डोळ्यांचं.”


तुम्हाला हे लेखन आवडलं तर खाली असलेल्या Email या बटणावर क्लिक करून तुमच्या मित्रांना या लेखनाबद्दल कळवा.

This entry was posted in जीवन भाषा and tagged , , . Bookmark the permalink.